बारामतीत ‘फटाका बुलेट सायलेन्सरवर’वर पोलिसांनी चालविला बुलडोझर
बारामती : शहर शांत, सुंदर आणि कायम सुरक्षित राहावं या उद्देशाने बारामती वाहतूक शाखेने अखेर शहरात ध्वनीप्रदूषणाचा कहर करणाऱ्या ‘फटाका सायलेंसर’वाल्या बुलेटस्वारांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सूचना, दंडात्मक कारवाया याला केराची टोपली दाखवणाऱ्या टवाळखोरांना चाप लावत आतापर्यंत तब्बल ५८ बुलेट गाड्यांचे फटाका सायलेंसर जागेवरच काढून बुलडोझर चढवला आहे. या मोहिमेमुळे शहरातील गल्लीपासून मुख्य रस्त्यांपर्यंत ‘धडधड’ करणाऱ्या बुलेटस्वारांना चांगलाच दणका बसला आहे.
ही विशेष मोहीम पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात ५६ कारवाया करण्यात आल्या होत्या, तर यावर्षी सुरुवातीपासूनच पोलिसांनी गती वाढवत ५८ कारवाया करत ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांना एकूण १११ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण ५८ बुलेटस्वारांचे सायलेन्सर वर बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड, वाहतूक पोलीस निरीक्षक यादव आणि पोलीस जवान उपस्थित होते.
फॅशन, स्टाईल आणि अटेंशन मिळवण्यासाठी अनेक तरुण मूळ बुलेट गाड्यांमध्ये बेकायदेशीर बदल करून ‘फटाका सायलेंसर’ लावतात. हे सायलेंसर इतका मोठा आवाज करतात या गाड्यांचा आवाज म्हणजे एक ‘ध्वनी दहशत’ बनली होती. पोलिसांनी अनेक वेळा सूचनाही केल्या, मात्र कायद्याचा धाक राहिलेला नाही हे पाहून मोटार वाहन कायद्यानुसार थेट कारवाईचा निर्णय पोलिसांनी घेतला. वाहतूक पोलिसांच्या या मोहिमेचे सर्व स्तरांतून मोठे कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही नागरिकांकडून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक सुभाष काळे, पोलीस जवान प्रदीप काळे, रूपाली जमदाडे, सुधाकर जाधव, प्रशांत चव्हाण, अशोक झगडे, रेश्मा काळे, सीमा घुले, स्वाती काजळे, माया निगडे, सीमा साबळे, अजिंक्य कदम आणि गृह रक्षक दलाचे जवान अमन मंडले रोहित शिंदे, अभिषेक टेके यांनी केली..
कायदा हा आपल्या संरक्षणासाठी आहे. शहर शांत ठेवायचं असेल तर कायदा पाळणं गरजेचं आहे. जो कायदा मोडेल त्यावर कारवाई निश्चित आहे.
~ सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती
मोठ्या आवाजाचे सायलेन्सर आपल्या परिसरात असतील तर तत्काळ 9923630652 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे अथवा मेसेज करून कळवावे. अशा हुल्लडबाजांवर वर कारवाई करण्यात येईल.
~ चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक
