काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं…अजित पवार

बारामती : मी काका कुतवळ यांना एका रस्त्याबद्दल सांगितलं आहे. त्याबद्दल सहकार्य करा. मी बीडीओंना सांगितले आहे, तहसीलदारांना सांगितले आहे, पीआयला सांगितले आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे चालत नाही. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल दादा घसरले, दादा कोणावर घसरले नाहीत, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना टिप्पणी केली.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. कार्यक्रमास महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, जनाई शिरसाई योजनेचे कार्यकारी अभियंता अशोक शेटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता राजकुमार जाधव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, कुतवळवाडी- बोरकरवाडीच्या सरपंच रुपाली भोसले, उपसरपंच राणी बोरकर, टी.सी.एस. फाउंडेशनचे सिद्धार्थ इंगळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्यासह अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला. पाण्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, यासाठी आम्ही जनाई शिरसाई योजना केली. योजना करणं आमचं काम आहे. परंतु, त्याचा मेंटेनन्स करणं हे तुमचं काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. नागरिकांना पाणी पुरवठा करणे शासनाचे कर्तव्य असून नागरिकांना पाणी मिळण्याकरीता जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचा ४६० कोटी रुपयाचे बंद पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. आज लोकार्पण झालेल्या पाईपलाईनमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे अत्याधुनिक साधनाचा वापर करुन शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. शासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्ती करण्याकरीता निधीची गरज असते, त्यामुळे नागरिकांनीही नियमितपणे पाणीपट्टी भरुन सहकार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले.
उपसा सिंचन योजनेसाठीवर सौर पॅनल बसविण्यात येणार
आगामी काळात जनाई शिरसाई आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी सौर पॅनल बसविण्यात येणार आहेत. सौर उर्जेद्वारे निर्मिती होणारी वीज महावितरण कंपनीला दिली जाणार असून यामुळे योजनेच्या वीज देयकात कपात होईल, त्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपट्टीतही लाभ होईल, अशी माहिती देखील पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी पुरवठा योजनांची पाहणी
पवार यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणाऱ्या मुर्टी व इतर ७ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आणि मुर्टी व लोणी भापकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या सस्तेवाडी येथील तलावाच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून परिसरातील ११ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे, नागरिकांना पूर्णवेळ पाणी पुरवठा होण्यासाठी महावितरणने वीजेच्या फिडरचे काम वेळेत पूर्ण करावे. पाईपलाईनमधून पाणी गळती होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. तालुक्यात रेल्वे, रस्ते, पाणी, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रात विविध विकास कामे सुरु असून ही सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पाहणीप्रसंगी पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
नागरिकांना पक्की घरे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न
राज्यात २० लाख घरे मंजूर करण्यात आली असून पुणे विभागातील ३० हजारपैकी बारामती तालुक्यात ५ हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक दूर्बल घटकातील कुटुंबाना पक्की व हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
नागरिकांना विश्वासात घेऊनच सुपा ग्रामपंचायत प्रारुप विकास आराखडा अंतिम करण्यात येईल
नागरिकांच्या मुलभूत गरजा भागविण्याच्यादृष्टीने सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता विकास आराखडा तयार करण्यात येतो. यामध्ये रस्ते, शाळा, भाजी मंडई, स्मशानभूमी, दफनभुमी, मंदिरे, घनकचरा व्यवस्थापन केंद्र, महावितरण केंद्र, दवाखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, घरकुल योजना, मैदान, क्रीडांगण आदी पायाभूत सुविधा उभारण्याकरीता आरक्षण निश्चित करण्यात येते. आगामी सन २०४६ मधील लोकसंख्येचा विचार करून सुपा ग्रामपंचायतीचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने नागरिकांकडून प्राप्त सूचना व हरकतींच्या सुनावणीदरम्यान नागरिकांना विश्वासात घेवून प्रारुप आराखडा अंतिम करण्यात येईल. संपादित केलेल्या जमिनीचा नागरिकांना योग्य तो मोबादला देण्यात येईल, याकामी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पवार म्हणाले