बारामतीत बेकायदा सुरु असलेल्या नेट क्रिकेटचा नागरिकांना मनस्ताप

बारामती : बारामतीत बेकायदा आणि विना परवानगी नेट क्रिकेटचे प्रस्त चांगलेच वाढत चालले असून तो खेळ रात्र-रात्रभर बिनबोभाट कोणाच्या वरद हस्ताने सुरु आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बारामती शहरात अनेक ठिकाणी विना परवाना नेट क्रिकेट सुरु करण्यात आली आहे त्यामुळे रात्रीच्या खेळाडूंची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरु आहे मात्र या विषयी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिस प्रशासनाचा कोणीच परवाना घेतला नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
या नेट क्रिकेटच्या खेळाच्या काही ठिकाणी बेकादेशीर मध्यपान, व्यसनाधीनता आणि मध्यरात्रीचा संबंधित खेळाडूंचा वावर यामुळे त्या-त्या परिसरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर काही ठिकाणी अनुचित घटना घडत आहेत मात्र त्याला जाब कोठे विचारायचा हा ही प्रश्न आहे. कारण जेथे हा नेट क्रिकेटचा खेळ सुरु करण्यात आला आहे त्यातील काही ठिकाणी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचीच आहेत. त्यामुळे असून अडचण..आणि नसुन खोळंबा अशी अवस्था आसपासच्या नागरिकांची झाली आहे.
ज्या ठिकाणी नेट क्रिकेट खेळण्यासाठी शहरात व्यवस्था करण्यात आली आहे तेथे तो प्रकार ताशी तत्वावर खेळाडूंकडून पैसे घेऊन खेळला जात आहे, मात्र त्याची कोठेही परवानगी घेऊन व्यावसायिक कर भरला जात नाही तसेच नेट क्रिकेट रात्री दहा नंतर देखील रात्री उशिरा पर्यंत सुरु असते मग त्यावर प्रशासन का गप्प आहे ? हाही प्रश्नच आहे. एकीकडे रात्रीचे हातगाडीवाले, शतपावली करणाऱ्या नागरिकांना प्रशासन अनेक प्रश्न विचारून हैराण करते मग या नेट क्रिकेटला नियम नाहीत काय ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.