भ्रष्ट अधिकाऱ्यावरील कारवाईचे क्रेडाईने केले समर्थन

बारामती : बारामती नगरपालिकेचे नगररचनाकार विकास ढेकळे यांना एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून या केलेल्या प्रशासकीय कारवाईचे क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने समर्थन केल्याचे प्रसिद्धी पत्रक संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
19 मार्च रोजी क्रेडाई बारामतीचे सदस्य भगवान चौधरी यांच्या तक्रारी वरून बारामती नगरपालिकेचे नगररचनाकार विकास ढेकळे यांच्यावर लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे. चौधर यांना नगररचनाकाराने बांधकाम परवानगी देण्यासंबंधी पैशाची मागणी केली होती. नगरपरिषद बारामती नगरपरिषदेस मिळणाऱ्या महसुलापैकी मोठा वाटा हा बांधकाम परवानगीच्या माध्यमातून जमा होत असतो बारामती शहराच्या विकासामध्ये बारामतीतील बांधकाम व्यवसायकांचा मोलाचा वाटा आहे या संदर्भाने क्रेडाई बारामती म्हणून आम्ही सदर निवेदनात नमूद करतो की, बारामती नगरपरिषदेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा प्रचंड त्रास बारामती मधील सर्व बांधकाम व्यवसायिकांना मागील काही वर्षापासून होत असून वरिष्ट अधिकारी सुद्धा याकडे कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे, तरी या निवेदनाद्वारे आम्ही क्रेडाई बारामतीतर्फे वरील विकास ढेकळे यांच्यावरील प्रशासनाने केलेल्या कारवाईचे समर्थन करत असून क्रेडाई बारामतीच्या वतीने प्रशासनास विनंती आहे की, वरील प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भविष्यात कार्य तत्परता व कार्यक्षमता वाढवावी असे प्रसिद्धीपत्रक क्रेडाईचे अध्यक्ष राहुल खटमोडे व सचिव अमोल कावळे यांनी प्रसिद्ध केले आहे.