आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी, तर धनंजय मुंडेंना सहआरोपी करा… आंदोलकांची मागणी

बारामती : धनंजय मुंडे यांच्या राजकीय सत्तेमुळेच आरोपींचे खुनाचे धाडस झाले असा आरोप या सभेत करण्यात आला तसेच धनंजय मुंडे यांची सखोल चौकशी करून तपासांती त्यांचा गुन्ह्यामध्ये संबंध आढळून आल्यास त्यांना सहआरोपी करण्यात यावे व फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली.
स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा बारामती यांच्यावतीने सर्व धर्मीय जन आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते, मोर्चामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबिय देखील सहभागी झाले होते. यामध्ये त्यांची मुलगी वैभवी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख हे सहभागी झाले होते. मोर्चा शहरातील शिवाजी महाराज उद्यान येथून निघून नगरपालिकेसमोर भिगवण चौक येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील नागरिक मोठ्या संखेने सहभागी झाले होते. तसेच महिलांची, युवक, युवतींची देखील मोठ्या संखेने उपस्थिती होती. मोर्चा शिवाजी महाराज उद्यान येथून निघून, गुणवडी चौक मार्गे, मारवाड पेठेतून गांधी चौक व सुभाष चौक मार्गे भिगवण चौकात दाखल झाला. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अमानुषपणे निर्घृणपणे हत्या करण्यात आली. स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येला तीन महिने उलटले आहेत.मोर्चात सुरुवातीला युवतींनी प्रातिनिधिक स्वरूपात मत व्यक्त केले. त्यानंतर धनाजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी भवना व्यक्त केली.
पोलिसांकडून आरोपींना अभय
दरम्यान जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आले तेव्हा माध्यम प्रतिनिधींना पोलिसांकडून धनंजय देशमुख यांची मुलाखत घेण्यास नकार दिला जात आहे. मध्यम प्रतिनिधींनी जोर दिल्यानंतर देशमुख कुटुंबियांच्या प्रतिक्रिया मिळाल्या. यावेळी धनंजय देशमुख म्हणाले की, ही जी टोळी होती ती सराईत गुन्हेगारांची टोळी होती ती पोलिसांसोबत सर्रास वावरत होते, आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे त्याला शोधून त्याला शिक्षा दिली पाहिजे, पोलिसांकडून त्याला अभय मिळत होतं तो यंत्रणेला घाबरत नाही तर सर्वसामान्यांना काय घाबरणार असा सवाल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला ते पुढे म्हणाले की 1578 पानाचे चार्जसीट आहे त्याचा अभ्यासकरणे वकिलांना आणि आम्हाला अवघड गोष्ट आहे दोन चार दिवसात तपास होणं कठीण गोष्ट आहे मात्र राहिलेला भाग आहे तो सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये घेता येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे
निवेदनाद्वारे मागण्या
मोर्चाचे वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना प्रांताधिकारी यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले निवेदनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आल्या 1) सदर गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांची सखोल चौकशी करून तपासांती त्यांचा गुन्ह्यामध्ये संबंध आढळून आल्यास त्यांना सहआरोपी करण्यात यावे व फाशीचे शिक्षा देण्यात यावी 2) सदर आरोपींच्या विरोधात खटला हा त्या जिल्ह्यातील न्यायालयात चालवला जाऊ नये इतर जिल्ह्यात किंवा मुंबईमध्ये चालवला जावा कारण सदर आरोपीचे सदर जिल्ह्यामध्ये मोठी दहशत आहे त्यामुळे ते साक्षीदारांवर दबाव निर्माण करू शकतात 3) त्यांच्यावर दाखल झालेला खटला जलदगती कोर्टात चालवावा 4) तपासामध्ये फरार आरोपीस तात्काळ अटक करून अन्य सह आरोपींच्या विरोधात गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा. 5) सदर आरोपींना देण्यात येत असलेली जेलमधील शाही वागणूक बंद करावी 6) सदर गुन्ह्यात अटक असलेल्या गुन्हेगारांना त्या जिल्ह्यातील जेलमध्ये न ठेवता दुसऱ्या जिल्हा कारागृहामध्ये ठेवावे जेणेकरून गुन्हेगार स्वतःचे गुन्हेगारी साम्राज्य चालवु शकणार नाही. 7 ) जास्तीत जास्त पुरावे देऊन आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याकरता योग्य ती कारवाई करावी असे निवेदन मराठा क्रांती मोर्चा बारामती यांच्या वतीने शासनास देण्यात आले.
उपस्थितांना अश्रू अनावर
जेव्हा स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख ही बोलत होती तेव्हा उपस्थितांना अश्रु अनावर झाले.