October 24, 2025

अवैध प्रवासी वाहतुकीला बारामती वाहतूक पोलिसांचा ‘दणका’ ; चार खाजगी वाहनांवर खटले

WhatsApp Image 2025-03-06 at 1.12.30 PM

बारामती : पोलीस प्रशासन आणि वाहतूकीच्या नियमांना धाब्यावर बसवून सुरु असलेल्या खाजगी अवैध वाहतुकीला बारामतीच्या वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. चार प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर न्यायालयात खटले पाठविले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
बारामती बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या अवैध प्रवाशी वाहनांवर कारवाई केली असून त्यामध्ये मारुती सुझुकी इको (एम.एच.४२ बी.जे ३८७८), मारुती ओमीनी (एम. एच.१२ एच.व्ही. ४८३२), मारुती सुझुकी इको (एम.एच. ४५ ए. यु.०५८५) महिंद्रा ऍपे (एम.एच.१२ जे.यु.१२५०) अशा एकूण चार वाहनांचा समावेश आहे. पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या अनुचित प्रकारानंतर आता बारामतीच्या वाहतूक शाखेनही कंबर कसली आहे. अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती बसस्थानक परिसरात वाहतूक पोलीसांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूक नियमांना आणि महिला सुरक्षेला प्राधान्य देत हे पाऊल टाकण्यात आले आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे वाहतूक नियमांची पायमल्ली होते. प्रमाणापेक्षा अधिक प्रवाशी बसवून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. अनेकवेळा अपघात घडतात त्यानंतर कायदेशीररीत्या भरपाई मिळण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. याबाबत वृत्तपत्रांनीही आवाज उठवला होता. रस्ता सुरक्षा, पार्किंग, नायलॉन दोरीचा प्रयोग, फॅन्सी नंबर, फटाका सायलेंसर, रेसिंग कार, पार्किंग साठी प्रयत्न, वाहन परवाना, ट्रिपल सीट आदी कारवायानंतर आता खाजगी अवैध वाहतुकीला चाप बसविण्यासाठी बारामती वाहतूक पोलीस प्रयत्न करत आहेत. या कारवाईला २ हजार ते ५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. त्यामुळे यापुढेही कारवाईचा बडगा सुरूच राहणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे, सुधाकर जाधव, प्रदीप काळे, अशोक झगडे, सिमा साबळे, रूपाली जमदाडे आदींनी केली आहे.

‘सर्वांनीच वाहतूक नियमांचे पालन करावे. जर कोणी वाहतूक नियमांची पायमल्ली करताना मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. वाहतूक नियम मोडणाऱ्यांची माहिती द्यावी असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!