प्रजासत्ताक दिनादिवशी प्रशासनाला त्यांच्या जबाबदारीची आठवण करण्यासाठी आमरण उपोषण
बारामती : बारामती विभागात केले जात असलेल्या बेकायदेशीर गौण खनिज उत्खननावर प्रशासनाने कारवाई करावी या मागणीवरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी प्रशासकीय भवनासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी निकाळजे यांनी उपोषण सुरु केले आहे प्रशासनाला त्यांच्या कामाची आणि जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी उपोषण करावे लागत आहे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. बारामती परिसरात गौण खनिज उत्खनन करणारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे, त्यावर सपशेल डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे अशी खंत निकाळजे यांनी व्यक्त केली.
यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून पुढील मागण्या निकाळजे यांनी केल्या आहेत.
1) बारामती तालुक्यातील सर्व प्रकारचे बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन बंद करून संबंधितांवर कारवाई करावी.
2) जुनेद राजू झारी या युवकाचा मुरूमाची वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरने चिरडल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. संबंधितांवर कारवाई करावी तसेच या युवकाला चिरडणाऱ्या हायवा ही वाहतूक बारामती औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. R – 2 या क्षेत्रातून करत असल्याने येथील पंचनामा करून संबंधितांवर पाचपट दंडाची कारवाई करावी.
3) ए. एस. देशमुख अँड कं. यांनी बेकायदेशीर मुरूम उत्खनन केले आहे त्यांच्यावर पाचपट दंडाची कारवाई करावी.
4) या पूर्वीचे बारामतीचे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांनी शासनाची फसवणूक करून शासनाचा कर चुकवणाऱ्यांवर कारवाई न करता अर्ज निकाली काढले आहेत त्यांच्यावर कारवाई करावी.
5) सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी व विभागाने काढलेले ठेके त्या ठेक्यावर काम करणारे ठेकेदार उत्खननाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता उत्खनन करतात त्याची रॉयल्टी सार्वजनिक बांधकाम विभाग पाचपट कट करण्याऐवजी एक पट व बाकीचे चारपट रॉयल्टी वसूल करून घेत नाहीत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तसे आदेश करावे की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या रॉयल्टी कट करत असताना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे पालन करून दंड वसूल करण्यात यावा. या मागण्यासाठी उपोषणाला प्रशासकीय भवनासमोर सुरुवात केली आहे.
