महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हायवाने चिरडलं, अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

बारामती : बारामती शहरातील तांदुळवाडी येथे एका हायवाने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अपघातातील दुचाकी वर असलेल्या दुसरा विद्यार्थी जखमी झाला आहे.
जुनेद झारी (वय 19 वर्षे ) याचा घटनेत मृत्यु झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याचा मित्र तुषार भिसे हा जखमी झाला आहे अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. जुनेद झारी आणि तुषार भिसे हे दोघेही शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील विद्यार्थी असून दुपारी महाविद्यालयातून घरी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. या अपघातात समोरून आलेल्या हायवाने अचानक वळण घेतल्यामुळे दुचाकी चालक थेट हायवाच्या पुढच्या चाका खाली गेले, या अपघातात जुनेद हा जागीच चिरडला गेला, त्यामुळे जुनेदचा जागीच मृत्यू झाला झालेल्या घटनेत जुनेदचा मित्र तुषार याने हायवाचा पाठलाग करीत चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र हायवा चालक घटनास्थळावरून फरार झाला, दरम्यानच्या काळात पोलिसांनी हायवा चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि नातेवाईक संतप्त आहेत. दरम्यान दुपारी दोन वाजता घटना घडूनही पोलिस प्रशासनाने घटनास्थळी जाण्यास चार वाजविले त्यामुळे संतप्त जमावाने हायवावर दगडफेक केली मग लागोलाग पोलिस घटनास्थळी आले. त्यातच उशिरा पर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु होते.
सदरचा हायवा हा बेकायदा मुरूम वाहतूक करीत होता तसेच त्याचे पासिंग बिहारचे आहे, बारामती परिसरात हायवाचे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यावर प्रशासन मात्र मुग गिळून गप्प आहे, जास्तीचा लोड घेऊन बारामती परिसरात हायवा बेदरकपणे वाहतूक करीत आहेत त्यावर कोणताही प्रशासनाचा अंकुश नाही, वेळीच प्रशासनाने लगाम घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा तीव्र निदर्शने केले जाण्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी बोलताना व्यक्त केली