बारामतीच्या प्रदर्शनात तब्बल ११ कोटींचा सोनेरी घोडा

बारामती : बारामतीच्या कृषी प्रदर्शनात एका घोड्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा घोडा तब्बल अकरा कोटी रुपयांचा आहे. घोड्याची किंमत पाहूनच सर्व आवाक होत आहेत, अकरा कोटींचा घोडा हैदराबाद मधून बारामतीत दाखल झालेला असून त्याचा सोनेरी रंग आकर्षण ठरत आहे.
बारामतीच्या विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात हैदराबादचे नवाब हसन बिंद्रिप यांचा सोनेरी रंगाचा घोडा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असून, हा घोडा पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह अश्वप्रेमींची गर्दी झाली होती.
या घोड्याच्या डोळ्याचा व शरीराचा रंग सोनेरी असल्याने हा घोडा आकर्षित करत आहे. हा घोडा आठ वर्षाचा असून पुष्करच्या यात्रेतून हा घोडा आणि घोडी नवाबांनी खरेदी केल्याचे सांगितले. हा घोडा यापूर्वी आम्ही फक्त मालेगावच्या यात्रेत नेला होता. आम्ही शौक म्हणून घोडे आणि इतर जनावरे पाळतो, इथे रणजीत पवार यांच्या खास निमंत्रणावरून बारामतीत आल्याचे त्यांनी सांगितले. हा घोडा देशात एकमेव असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे, हा मारवाडी घोडा आहे, आणि मारवाडी जातीचा सोनेरी घोडा देशातील हा एकमेव घोडा असल्याचे देखील नवाबांनी सांगितले.
या घोड्याचा खुराकाचा एका महिन्याचा खर्च साधारण 70 ते 80 हजार असून घोड्याला ऋतुमानानुसार खुराक द्यावा लागतो. तर या घोड्याला पाच शुभ संकेत आहेत त्यामुळे त्याची जास्त किंमत आहे त्याच्या तोंडावर आणि चारही पायांवर पांढरे पट्टे आहेत.