बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट येरवड्याला रवानगी
बारामती : काही दिवसांपूर्वी बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवीत असलेल्या चौघांवर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी कारवाई करीत आरोपींची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे.
बारामती शहरामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम तसेच व्हाट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून शस्त्रे हातात घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या युवकांवर कारवाई करण्याचा इशारा बारामती पोलीस प्रशासनाने दिलेला होता, त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली असून अप्पर पोलीस अधीक्षक बारामती तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोयता हातात घेऊन मिरवणाऱ्या पुढील आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून योग्य जामीनदार हजर करू न शकल्याने आरोपी 1) यश दीपक मोहिते , 2) शुभम उर्फ बाळू काळू जगताप दोघे रा. आमराई, बारामती 3)आदित्य राजू मांढरे ( रा. चंद्रमणीनगर अमराई बारामती ) व 4) अनिकेत केशवकुमार नामदास ( रा. दीपनगर भवानीनगर ता. इंदापूर ) या चौघांची मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे साध्या कारावासासाठी रवानगी केलेली आहे. बारामती शहरातील ही पहिलीच कारवाई असून सदरचा प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती कार्यालयास पाठवला होता.
नागरिकांना आवाहन
यापुढे जागरूक नागरिकांनी अशा पद्धतीचे स्टेटस सोशल माध्यमावर ठेवलेल्या इसमांचे स्क्रीन शॉट घेऊन शक्ती नंबरवर किंवा प्रभारी अधिकारी यांना पाठवल्यास त्या आरोपींवर याच पद्धतीची कारवाई करण्यात येईल व बातमीदार यांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.. असे आवाहन पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी केले आहे. शक्ती नंबर … 9209394917
जागरूक पालकांनी / शिक्षकांनी, तसेच नागरिकांनी शहरातील चौका चौकात टवाळखोरी करणाऱ्या, शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाडी करणाऱ्या, उघड्यावर मद्य प्राशन करणाऱ्या युवकांची माहिती व फोटो शक्ती नंबरवर पाठवावी त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
