पंढरपूर बँकेच्या शाखा अधिकाऱ्याने केली नऊ कोटींची अफरातफर
बारामती : बारामतीच्या पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूर शाखा बारामतीच्या बँकेच्या बँकेतील शाखा अधिकारी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे या बँकेत सुमारे नऊ कोटी तीन लाख नऊ हजार 361 रुपयांची अफरातफर ( अपहार ) केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी अमित प्रदीप देशपांडे (रा. सहयोग सोसायटी बारामती ) या शाखा अधिकाऱ्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर बँकेचे मुख्य शाखेकडून कृष्णकुमार पुरुषोत्तम पेंडाल (रा कोर्टी रोड, परिचारक नगर पंढरपूर ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश वीरधे यांनी ताळेबंद पत्रकाचे अवलोकन केले असता बारामती शाखेत संशयास्पद व्यवहार होते असल्याचे त्यांना निदर्शनास आले त्यांनी फिर्यादीला तपासणीचे आदेश दिले त्यानुसार तपासणी केली असता ही बाब समोर आली आली आहे.
देशपांडे यांनी पदाचा गैरवापर करत तसेच कॅशिअर यांच्या कोडचा बेकायदा वापर करत बनावट कागदपत्र तयार केली ती खरी असल्याचे दाखवुन बँकेत अपहार केला आहे, बारामती शाखेच्या सस्पेन्स रिसिव्हेबल खात्यातून अधिकार नसताना दोन कोटी तीस लाख रुपये परस्पर उचल करून ती त्यांनी उघडलेल्या बारामतीच्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या खात्यात टाकली, तसेच बँक ऑफ बडोदा येथे भरणा करण्यासाठी 31 लाख रुपये काढत, भरणा न करता त्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावली, धन्वंतरी पतसंस्थेच्या नावे पाच बनावट ओडिटीआर खाते उघडून त्यातील तीन कोटी 23 लाख 71 हजार 897 रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरले, तसेच बारामती शाखेतील ग्राहकांचे सोनेतारण कर्ज खाते प्रकरणांमध्ये 83 खातेदारांचे बँकेत ठेवलेले खरे दागिने काढून तेथे बनावट दागिने ठेवले खरे दागिने बाहेरील फायनान्स कंपनीना देऊन त्यावर कर्ज काढले, त्यासाठी दहा ग्राहकांच्या नावे बनावट खाते काढली त्यावर बनावट सह्या करून त्या खात्यावर कर्ज वितरित केले त्या बदल्यात सोने ठेवल्याचे दाखवून त्यांच्या नावे बँकेत बनावट सोने ठेवले त्याद्वारे 37 लाख 56 हजार 803 रुपये स्वतःसाठी वापरले तर बँकेतील सोनेतारण कर्ज खाते प्रकरणांमध्ये तीन कोटी 18 लाख 37 हजार 446 रुपयांचा वापर केला अशी एकूण बँकेची नऊ कोटी तीन लाख नऊ हजार 361 रुपयांचा वापर करत बँकेचे फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे हे पुढील तपास करीत आहेत
