माळेगावात धारदार शास्त्राने एकावर प्राणघातक हल्ला, …काही तासात आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद
बारामती : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये एका युवकावर धारदार शस्त्राने प्राण घातक हल्ला केल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी पोलिसांनी चार युवकांना ताब्यात घेतले असून चौघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत प्रकाश उर्फ पप्पू दिगंबर भापकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी चेतन बाळू जाधव, मयूर रणजीत जाधव, विजय बाळासो कुचेकर आणि दिनेश अडके ( सर्व रा. माळेगाव ता. बारामती ) या चौघां विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, चेतन जाधव यांच्या वडिलांची आणि भापकर यांचे भांडण काही दिवसांपूर्वी झाले होते त्यात भापकर यांना शिवीगाळ आणि मारहाण झाली होती, याचा राग मनात धरून चेतन जाधव आणि त्याचे इतर तीन साथीदार यांनी भापकर काम करीत असलेल्या एक खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात जाऊन तिथे भापकर यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला, दरम्यानच्या काळात कार्यालयातील इतर नागरिकांनी आरडाओरडा केल्याने चारही हल्लेखोर आरोपी घटनास्थळावरून मोटारसायकलवरून निसटले, घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमिला दवाखान्यात दाखल केले, तर या घटनेतील तीन आरोपींना फलटण नगरपालिकेच्या कचरा डेपोच्या हद्दीत पोलिसांनी पाठलाग करून फिल्मी स्टाईलने पकडले आणि एकाला मौजे पणदरे गावच्या हद्दीत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही तासातच पोलिसांनी आरोपींना अटक केल्याने पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीकर माळेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर, देविदास साळवे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शरद तावरे, पोलिस हवालदार अमर थोरात, ज्ञानेश्वर सानप, नंदकुमार गव्हाणे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, जालिंदर बंडगर, विकास राखुंडे, होमगार्ड सागर कोळेकर, विक्रम मदने यांनी केली.
कोयता गँगचा माज मोडणार तरी कधी ?
बारामती आणि परिसरात दिवसेंदिवस गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत, आणि पोलिस यंत्रणा मात्र गुन्हेगारांवर वाचक ठेवण्यात अपयशी ठरताना वारंवार दिसत आहे, त्यामुळे एकूणच पोलीस यंत्रणा या कोयता गँगचा माज मोडणार तरी कधी ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
