Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the covernews domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/u280364396/domains/thekesari.live/public_html/wp-includes/functions.php on line 6121
आमचे कणखर दादा आता आम्हाला कुठेच का दिसत नाहीत ? कार्यकर्त्याचे अजित पवारांना निनावी पत्र - THE KESARI
April 20, 2025

आमचे कणखर दादा आता आम्हाला कुठेच का दिसत नाहीत ? कार्यकर्त्याचे अजित पवारांना निनावी पत्र

IMG-20240911-WA0066

आमचे कणखर दादा आता आम्हाला कुठेच का दिसत नाहीत ? कार्यकर्त्याचे अजित पवारांना निनावी पत्र

बारामती : बारामतीत सध्या समाजमाध्यमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी कार्यकर्त्याने आमचे कणखर दादा आता आम्हांला कुठेच का दिसत नाहीत ? असा सवाल उपस्थित केला आहे. तर दादांच्या नजरेतील संशय आणि बदलेली वागणूक या विषयी त्या पत्रातून कार्यकर्त्याने अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

अजित पवारांच्या कार्यकर्त्याने लिहिलेलं पत्र जशास तसे

आदरणीय दादा,

बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय. लिहावं का नाही हा खूप विचार करत होतो.‌ पण, काल आपल्या बारामतीत तुमच्या फोटोला काळे कापड लावलं गेलं. तेव्हा वाटलं आता लिहिण्याशिवाय पर्याय नाही. आज आमचं दुर्दैव आहे की नाव लपवून लिहावं लागतंय. कारण, नाव कळालं तर आम्हाला पुढे राजकारणात भविष्य राहील का? हा प्रश्न आम्हाला पडतोय. आजकाल तुमचं वागणं, बोलणं, सांगणं आणि ऐकणंसुद्धा पार बदलून गेलंय. तुम्ही टीव्हीच्या मुलाखतीत आणि जनसन्मान यात्रेच्या भाषणात ‘चूक’ झाली म्हणून जी काही जाहीर कबुली देताय, त्यामुळे तुमचं नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न माझ्या सारख्या लाखो दादाप्रेमी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

तोचं संभ्रम तुमच्या काल-परवाच्या बारामतीच्या सभेनं अधिकचं गडद केलाय. सभेत तुम्ही भरभरून बोललात. मात्र, तुमचा ‘सूर’ नेमका कळत नव्हता? तुम्ही खदखद व्यक्त करताय की सहानुभूती मिळविताय? किंवा भावनिक कार्ड खेळताय की मन मोकळं करताय? हेचं नेमकं समजत नव्हतं आणि अजूनही समजलेलं नाही. कारण, आता तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा, रोखठोक आणि लढावू बाणा हरवला आहे की काय? अशी भीती वाटत राहाते.

‘तुझी ग्रामपंचायत आली का रे’ किंवा ‘माईक चालू राहू दे, आपलं सगळं उघड असतं’ असं जाहीरपणे सांगणारे आमचे कणखर दादा आम्हाला आता पहिल्या सारखे वाटत नाहीत. सध्या तुम्ही फार चिडचिड करताय. राग, संताप व्यक्त करताय. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मी एकटाचं नव्हे तर, आपले सगळे जीवाभावाचे पदधिकारी, कार्यकर्ते आणि जवळची सगळी मंडळी पुरती घाबरून गेली आहेत. कारण, वैनींच्या पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सगळेचं जबाबदार आहोत अशी तुमच्या मनाची भावना झाली आहे, असे तुमच्या बोलण्यावरून सतत जाणवते. म्हणून तुमचं असं संशयाने पाहाणे, आता सहन होत नाहीये, जीवाची घालमेल होत आहे.

बघा ना, दादा तुम्ही माफी मागून मोकळे झालात. त्याच्या सर्वत्र बातम्या झाल्या. पण, या सगळ्या घडामोडीत आम्ही मात्र, पवार साहेबांच्या लेखी वाईट ठरलो. आता आम्ही नेमकी कुणाची माफी मागायची? हेही एकदा सांगा. तुमच्या निर्णयामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते दोन गटात विभागलो गेलोय. आता आम्ही एकमेकांचे तोंड सुद्धा बघत नाही. कामापोटी सहज बोललो किंवा निवांत गप्पा जरी मारल्या, तरी आमच्यावर संशय घेतला जातो. एवढं कलुषित वातावरण झालंय. अशावेळी तुम्ही मात्र, माफी मागून किंवा चूक कबूल करून आमचीचं पंचाईत केलीय. त्यामुळे माफी मागून तुम्ही तुमचा स्वार्थ साधला, आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलं अशी शंका माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या मनात का येवू नये?

दादा, लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात तुम्ही भावनिक होवू नका. विकासाला महत्त्व द्या. भावनिक होवून प्रश्न सुटणार नाहीत, असं म्हणत होतात. भावनिक होवून रडले म्हणून तुम्हीसुद्धा तशीच जाहीर ॲक्टींग केली होती. पण, आता मात्र तुम्ही स्वत: खूपचं भावूक होताय आणि आम्हालाही भावनिक करताय. त्यामुळे तुम्हाला नेमकं झालंय तरी काय? तुम्ही एवढे घाबरून का गेला आहात? तुमचा आत्मविश्वास पहिल्या सारखा का दिसत नाही? तुम्ही कसल्या तरी ओझ्याखाली दबलेले आहेत, असे वातावरण का निर्माण झाले आहे? आमचे कणखर दादा आता आम्हाला कुठेच का दिसत नाहीत? कधी नव्हे ते तुम्ही इतके हतबल का दिसत आहात? असे अनेक प्रश्न मला व आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पडले आहेत.

दादा, तुम्हाला आठवतंय का? पवार साहेबांच्या प्रचारात आमचा आजोबा फिरला आणि तुमच्या प्रचारात माझा बाप फिरला. पुढे तुमच्या आणि वैनींच्या प्रचारात तसेच पार्थ व जयदादासाठीही मी फिरलोय, फिरत आहे आणि उद्याही फिरत राहीन. कारण, आमच्या तीन पिढ्या कायम तुमच्या सोबत आहेत. वडीलांकडून प्रचाराचं काम शिकून मीही तुमचा प्रचार करत आलोय. ‘विकासाचा वादा, अजितदादा’ आणि ‘एकच वादा, फक्त अजित दादा’ अशा घोषणाही अगदी बेंबींच्या देठापासून देत आलोय.

मधल्या काळात तुम्ही वेगळा निर्णय घेतलात, तरीही ‘फक्त दादा’ असं म्हणून मी तुमच्या सोबत राहिलो आणि भविष्यातही आहे. त्यासाठी गेल्या तीस ते पस्तीस वर्षांची निष्ठा पणाला लावली. पण, तुमच्या सोबत निष्ठेनं राहिलो. लढलो. मात्र, वैनींचा पराभव झाला आणि तुम्ही मला आणि आपल्या असंख्य पदधिकारी व कार्यकर्त्यांना पाण्यात बघू लागलात. तुमच्या लेखी आम्ही कुचकामाचे किंवा आरोपी ठरलोय. म्हणून तुम्ही आमच्याकडे संशयाने पाहात आहात. त्यामुळे आता तुमच्या अवती-भवती सुध्दा येण्याची भीती वाटू लागलीय. तुम्ही कधी आणि काय बोलाल? याची चिंता सतावते आहे.

बारामतीतून आता मला रस नाही. आपण तसा समाधानी आहे? झाकली मूठ लाखाची. एवढी सगळी कामे करूनही बारामतीकर वेगळा निर्णय देवू शकतात, तर काय करणार? जिथं पिकतं, तिथं विकत नसंत. तुम्हाला एक नवीन आमदार मिळाला पाहिजे? मग, त्याची आणि माझी कारकीर्द बघा. शेवटी, मीचं निर्णय घेणार आहे. मला माझा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, अशी तुमची विधाने ऐकून मला तर, धक्काचं बसतोय. पण, अशा बोलण्यातून तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? हेचं मला कळत नाही. तरीही, तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य असेल.

आजपर्यंत तुमचे सगळे निर्णय मीच नव्हे तर, आम्ही सगळ्यांनी वेळोवेळी मान्य केलेत. तुमच्या निर्णयाच्या पाठीशी उभा राहिलोय. तुमच्या भूमिकेचा आदर केलाय. एके दिवशी तुम्ही अचानक सरकारमध्ये सामील झालात. तेव्हा, निधड्या छातीच्या दादांना गुवाहाटीला जाण्याची गरज नाही, असं म्हणत तुमचं समर्थन केलं होतं. त्यावेळी सगळ्यांनी आम्हाला ‘नमक हराम’ म्हटलं. तरीही मी मागे हटलो नाही. तुमच्यावर असलेल्या प्रेमापोटी ‘गद्दारीचा’ शिक्का पाठीवरती घेवून लोकसभेला गावोगाव फिरलो. वैनींचा प्रचार केला. पण, वैनींचा पराभव झाला आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते तुमच्यासाठी ‘कुचकामी’ आणि ‘गद्दार’ ठरलोय, याचं जास्त वाईट वाटतंय.

‘कसं, दादा म्हणतील तसं’ हे ब्रीद घेवून आजपर्यंत तुमच्यासाठी काम करीत आलोय. तुम्ही सांगाल ते ऐकत आलोय. मात्र, वैनींचा पराभव तुमच्या ‘जिव्हारी’ लागला आणि आपल्या नात्यात दुरावा आलाय. पण, दादा! लोकसभा निवडणुकीत मी प्रामाणिकपणे काम केलंय. गावोगावी प्रचार केलाय. तुमच्या विजयासाठी पायाला भिंगरी लावून फिरलोय, हे तुम्हाला कसं पटवून देवू? हेचं कळत नाहीये.

तुमचा माझ्यासह आपल्या कार्यकर्त्यांवर कधीच अविश्वास नव्हता. म्हणून तर, विरोधकांनी आम्हाला ‘मलिदा गँग’ म्हटलं, आम्ही तेही गपगुमान सहन केलं. कारण, माझ्यासाठी माझे दादाचं माझं काळीज आहे. आता तेचं दादा, आम्हा सगळ्यांना शंकेने किंवा संशयाने पाहाणार असतील तर, मी काय करायला हवं? सध्या ‘ना घर का न घाट का’ अशीच माझी आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आवस्था झाली आहे. मग, ज्या पवार साहेबांमुळे आम्हाला ओळख आणि पदे मिळाली. मान-सन्मान मिळाले. त्यांना तुमच्यासाठी धोका देवून आम्ही नेमकं काय मिळवलं? असंही वाटतंय.

दादा, अलीकडे तुमच्या बद्दल कुणीही काहीही बरळतं. तरीही तुम्ही गप्प बसता. नाही म्हणायला आपले प्रवक्ते मिटकरी बोलतात. पण, त्यांना कुणीही सिरीयसली घेत नाहीत. त्या तानाजी सावंत पासून ते गुलाबराव पाटील आणि संजय गायकवाड ते गणेश हाके पर्यंत सगळे तुमच्यावर तोंडसुख घेत आहेत आणि तुम्ही मात्र, आमच्यावर नाराज होवून आम्हालाचं आरोपीच्या पिंजऱ्यांत उभं केलंय, याचं फार वाईट वाटतंय.

एकीकडे तुम्ही हिंदी चॅंनलेला मुलाखती देताय. चूक झाली, असं सांगताय. समाजाला असलं आवडत नाही, म्हणताय. त्यामुळे तुमच्या नरमाईच्या सूराचा अंदाज येत नाही. हे तुम्ही स्वत:हून करताय की तुम्हाला कुणी कराय लावतंय? हाही प्रश्नचं आहे. तर, दुसरीकडे तुम्ही तिसरी आघाडी करून लढणार आहात, असं भाजपचे समर्थकचं सांगताहेत? त्यामुळे माझ्या सारख्या कार्यकर्त्यांच्या तुमची चिंता वाटतेय. कारण, तुमच्या सोबत आम्ही सुद्धा’गद्दारीचा शिक्का’ पाठीवरती झेललाय आणि तुम्हाला घराच्या देव्हाऱ्यातच नव्हे तर, आमच्या काळजात सुद्धा स्थान दिलंय.

दादा, सध्या तुम्ही ‘पिंक’ झाला आहात आणि तुमचे विचारही ‘पिंक’ झाले आहेत की काय? अशी शंका मला येत आहे. कारण, माझ्या सारख्या कार्यकर्त्यांसह जीवाभावाच्या सगळ्या पदधिकारी आणि कार्यकर्त्यांविषयी शंका घेणारे, त्यांच्या निष्ठेवर संशय घेणारे, त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणारे आमचे लाडके दादा कधीचं नव्हते आणि यापूर्वी आम्ही कधी अनुभवले सुद्धा नाहीत.

आपल्या बारामती विधासभेत तुतारीला 47 हजार 381 मतांचं लीड मिळालं आणि वैनींचा पराभव झाला. त्यामुळे तुम्ही रागावलात. तुमचं रागावणं स्वाभाविक आहे. तो पराभव जसा तुमच्या ‘जिव्हारी’ लागलाय, तसा तुमचा निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्या पराभवाची ‘सल’ मलाही आहे. पण, जास्त ताणू नका. रात गयी, बात गयी! म्हणून नव्या जोमाने कामाला लागूयात. निराशेची जळमटे फेकून द्या. जिद्दीने उभे राहू, जिद्दीने लढू आणि बारामतीचा गड पुन्हा एकदा काबीज करू!

कळावे आपलाचं,

एक निष्ठावंत कार्यकर्ता

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- घड्याळ तेच वेळ नवी

error: Content is protected !!