बारामतीच्या ठेकेदाराची बनवाबनवी चव्हाट्यावर ; ठेका मिळवण्यासाठी चक्क ग्रामपंचायतची केली फसवणूक

बारामती : बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायतचा ठेका मिळवण्यासाठी एका ठेकेदारांनी अजब शक्कल लढवल्याचे समोर आले असून, चक्क ठेका मिळवण्यासाठी खोटे नाव आणि बनावट डिमांड ड्राफ्ट भरून ठेका मिळवण्याचा प्रकार समोर आला आहे, या प्रकरणी सदरच्या ठेकेदाराविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हकीकत अशी की, बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायतचा नागरी सुविधा अंतर्गत वार्ड नंबर 2 येथे भूमिगत सांडपाणी व्यवस्था करण्याच्या कामासाठी 30 लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती, त्या कामाची निविदा मिळवण्यासाठी एका ठेकेदाराने चक्क दुसऱ्याच्या नावाचा आधार घेत आणि बनावट डिमांड ड्राफ्ट ग्रामपंचायत देत, 30% कमी दराने निविदा भरली आणि निविदा 30 टक्के कमी असल्याने ती मंजूर झाली, त्या निविदेची वर्क ऑर्डर घेण्यासाठी जेव्हा फोन केला तेव्हा प्रत्यक्ष ज्या नावाने निविदा भरली होती त्या व्यक्तीचा आणि निविदा भरणाराचा काही संबंध नसल्याचा बनवाबनवीचा प्रकार निदर्शनास आला. संबंधित ठेकेदाराने ठेका मिळवण्यासाठी पुणे जिल्हा बँकेचा डोर्लेवाडी शाखेचा 57000 चा डिमांड ड्राफ्ट काढून त्याची रंगीत झेरॉक्स काढून त्या झेरॉक्स वर 10 लाख 80 हजार अशी रक्कम भरून त्रयस्ताच्या नावाने खोटे व बनावट डिमांड ड्राफ्ट भरून निविदा मिळवण्याचा प्रयत्न केला तसेच बँकेची व ग्रामपंचायतीची फसवणूक केली या अनुषंगाने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.