नामवंत मल्लांनी गाजवलं बारामतीचं मैदान; पहिल्या क्रमांकासाठी हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटे यांच्यात झाली अटीतटीची लढत..!

बारामती : हलगीचा ताल.. बहारदार समालोचन, हजारो कुस्ती शौकिनांचा जल्लोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्त्यांचं मैदान पार पडलं. झालेल्या या मैदानात नामवंत मल्लांनी हजेरी लावत उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. या मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि उपमहाराष्ट्र केसऱी माऊली कोकाटे यांच्यात झाली. प्रचंड ताकदीच्या या पैलवानांनामध्ये तुल्यबळ लढत झाली. अखेरीस ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने आणि जय पवार यांच्या पुढाकारातून बारामती शहरातील शारदा प्रांगणात निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आलं होतं. या मैदानाला क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आमदार दत्तात्रय भरणे, जय पवार यांच्यासह आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू गिता फोगट, पवनकुमार, योगेश्वर दत्त, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आदी कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यात झाली. सुरुवातीला तब्बल ३० मिनिटे या दोघांमध्ये तुल्यबळ लढत झाली. त्यानंतर त्यांना १० मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला. दोघांनीही आपले कौशल्य पणाला लावल्यामुळे अखेरीस ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. दुसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी गणेश जगताप यांच्यात झालेल्या लढतीत पृथ्वीराज पाटील याने घुटना डाव टाकत विजय मिळवला.
तिसऱ्या क्रमांकासाठी महान भारत केसरी माऊली जमदाडे विरुद्ध महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख यांच्यात लढत झाली. तब्बल २६ मिनिटे झालेल्या या लढतीत बालारफीक शेख याने दुहेरी पट डावात विजय मिळवला. मुंबई महापौर केसरी भारत मदने विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवार यांच्यात चौथ्या क्रमांकासाठी लढत झाली. त्यामध्ये भारत मदने याने निकाल डावावर ही कुस्ती जिंकली. या मैदानात महिलांच्याही कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये राज्यातील नामवंत महिला मल्लांनी सहभाग घेत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली.
प्रास्ताविक राष्ट्रीय कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांनी केले. या संपूर्ण मैदानाचे समालोचन प्रशांत भागवत, प्रा. युवराज केचे यांनी केले. जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी या भव्य मैदानाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.