हवसे, नवशे, गवसे येतील, त्यांना भुलू नका ….अजित पवार
बारामती : चांद्यापासून बांद्यापर्यत माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार आहेत, तीन सिलेंडर मोफत देणार आहे, माझी महिला सक्षम व्हावी… आत्मनिर्भर व्हावी यासाठी ही योजना महायुतीने आणली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायचे आहे. निवडून नाही दिले तर ही योजना मला नीट राबवता येणार नाही असे सांगतानाच हवसे, नवसे..गवसे योजना कशी चुकीची आहे हे सांगायला येतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले. लोक हिताच्या योजना आणल्यानंतर आमच्यावर टीका केली जाते, परंतु त्या टीकेचा मी विचार करीत नाही, आता विधानसभेला महायुतीलाच निवडून द्यायचे आहे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्यावतीने जन सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या ‘जन सन्मान’ जाहीर सभेला राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार सुनेत्रा पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
पुढे अजित पवारांनी सांगितले की, लोकसभेला वेगळे वातावरण निर्माण झाले. आम्ही विकासावर बोलत होतो त्या सर्वांना बाजूला ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली ती घटना बदलतील असा खोटा प्रचार विरोधकांनी केला, तुमच्या – माझ्या महाराष्ट्रात काम करत असताना महिला, पुरुष, वृध्द, तरुण, मुलींवर अन्याय होणार नाही असा शब्दही अजित पवार यांनी यांनी यावेळी दिला. सत्ता येते जाते… कोण ताम्रपट घेऊन आलेला नाही. आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही, मात्र त्या सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसांसाठी करण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून मागे खेचायचे आहे. तुम्ही घाबरु नका राज्य आणि केंद्रसरकार तुमच्या पाठीशी आहे असा विश्वासही अजित पवार यांनी दिला. तर सत्ता ही पदे उपभोगण्यासाठी नसते म्हणून सर्व समाजघटकांतील मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ७५ हजार कोटी रुपये राज्यातील विविध घटकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. विकास हा राष्ट्रवादी काँग्रेसने डोळ्यासमोर ठेवला आहे त्यातून गरीबी दूर केली जाणार आहे असेही अजित पवार म्हणाले. विधानसभा मतदान होईपर्यंत ही जन सन्मान रॅली थांबणार नाही. संपूर्ण राज्य ढवळून काढणार आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
एकट्या बारामतीचा विचार केला तरी बारामतीमध्ये १८१ कोटी रुपये वर्षाला येथील महिलांना मिळणार आहेत. आम्ही खोटे बोलणार नाही. असे व्यक्त करीत अपयश आले तर खचून जायचे नसते तर यश आले तर हुरळून जायचे नसते यश अपयश पचवायला आले पाहिजे, लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याचा खोटा प्रचार केला, मात्र जो पर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत संविधान कोणीही बदलू शकणार नाही, अशा शब्दात आपली भूमिका पवार यांनी व्यक्त केली. तर कोण भावनिक करत असेल तर भावनिक होऊ नका त्यातून विकास होत नाही. येणाऱ्या निवडणुकीत बारामती बघत बघत मला महाराष्ट्रभर फिरायचे आहे त्यामुळे हे काम माझ्या घरचे नसून सर्वांचे आहे असे समजून इथल्या माझ्या लोकांनी जबाबदारी पार पाडायची आहे असेही अजित पवार कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना आवाहन केले.
पाऊस आला तरी कट्टर कार्यकर्ता जागेवरून हलला नाही….
दरम्यान मेळाव्यात पावसाने व्यत्यय आणला. अचानक पाऊस आल्याने इतर नेत्यांची भाषणे थांबवून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषण करावे लागले. अजित पवारांनी भर पावसात भाषण करून विरोधकांवर हल्ले केले, त्याचवेळी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घोषित केलेल्या योजनांचा आढावा घेतला. अजित पवारांनी भर पावसात भाषणाला सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या पावसाला डगमगणार नाही कट्टर कार्यकर्ते आहोत… आणि एकच वादा..अजितदादांच्या नावाचा घोषणांनी परिसर न्हाऊन निघाला.
पक्षातील अंतर्गत गटबाजी…..कार्यकर्ते नाराज…
एका बाजूला सर्व कार्यक्रमाचे नियोजन पक्षाच्या एकाच गटाने केले त्यामुळे पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते त्यांना त्यांचे स्वतःचे शक्ती प्रदर्शन करता आले नाही, तसेच आम्हांला अंधारात ठेवून कार्यक्रमाचे नियोजन केल्याचा रोष कार्यकर्त्यांनी बोलुन दाखविला त्यामुळे कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी स्थानिक पातळीवरील गट – बाजीने आज पुन्हा डोके वर काढल्याचे प्रकर्षाने जाणविले, तर दुसरीकडे पाऊस झाल्याने कार्यकर्त्यान व्यतिरिक्त आलेले नागरिक कार्यक्रमाच्या ठिकाणावरून निघून गेले.

