पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरीता पालकांचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपये पेक्षा कमी असावे. भटक्या जमाती-क प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवासभत्ता, निर्वाह मता उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी ६० हजार, इतर महसुली विभागीय शहरे, उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात ५१ हजार रुपये, इतर जिल्ह्याचे ठिकाणी ४३ हजार रुपये व तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपये इतक्या रकमेचा लाभ देण्यात येतो.
सदर योजनेकरीता असलेला अर्ज महाविद्यालयात देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक माहिती सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे-६ येथे संपर्क करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालिका संगिता डावखर यांनी केले आहे.