उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तर काटेवाडीत पालखी रथाचे सारथ्य देखील केले.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, हाती दिंड्या-पताका, मुखी विठ्ठल नाम अशा भक्तिमय वातावरणात काटेवाडीकडे प्रस्थान झाले. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.
पवार यांनी पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला आणि टाळाच्या साथीने विठूनामाचा गजर केला. पालखी मार्गावरील असलेल्या गावातील चौकात रांगोळी काढून, फुलांची उधळण करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज इंदापूर तालुक्यातील सणसर येथे मुक्काम असणार आहे.
बारामतीत अजित पवारांचे महिलांनी केले औक्षण
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसह महिलांसाठी अनेक योजनांचा समावेश करून त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिलानीं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विमानतळ येथे ओवाळून त्यांचे आभार मानले.