जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात प्रशासनाच्यावतीने स्वागत
बारामती : ‘हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ‘ या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानोबा- माऊली तुकाराम’….रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी… अशा जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती तालुक्यात आगमन झाले.
मौजे खराडेवाडी येथे प्रशासनाच्यावतीने उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे दर्शन घेऊन स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, तहसीलदार गणेश शिंदे, दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, बारामतीचे गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, दौंडचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, स्वप्नील जाधव, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासनातर्फे वारकऱ्यांसाठी सुविधा
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम उद्या दि 6 जुलै रोजी बारामती शहरात शारदा प्रांगण या ठिकाणी आहे. आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तालुका प्रशासन, बारामती नगरपरिषद, पंचायत समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्यावतीने तयारी केली आहे. वारीसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, वैद्यकीय पथके, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, फिरते सुलभ शौचालय, कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहेत.
