गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत बारामती उपविभागात १ कोटी ७२ लाख अनुदानाचा लाभ

बारामती : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत २०२३-२४ या वर्षामध्ये बारामती कृषी उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या तालुक्यातील ८६ अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना १ कोटी ७२ लाख रुपये इतक्या अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे.
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही करणांमुळे होणारे अपघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू होतो किंवा काहींना दिव्यांगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा दिव्यांगत्व आल्यास कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यास अडचण निर्माण होते. अशा शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ देण्यात येतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत ७/१२ उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना क्र. ६ क नुसार वारसाची नोंद, शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीकरीता शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्र, प्रथम पाहणी अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे, एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे या कारणास्तव २ लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये अर्थसहाय्य करण्यात येते.
अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या वारसदारांनी सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे ३० दिवसांच्या आत सादर करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.