October 24, 2025

महावितरणकडून आषाढी वारीत सूर्यघर योजनेचा प्रसार

IMG-20240704-WA0199
बारामती : सर्व सामान्य घरगुती ग्राहकांना वीजबिलातून मुक्ती देणारी केंद्र सरकारकडून राबविली जाणाऱ्या महत्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सूर्यघर- मुफ्त बिजली’ योजना घराघरांत पोहोचविण्यासाठी महावितरण सासवड विभागाने आषाढी वारीची संधी साधली असून, वारकऱ्यांना योजनेची पत्रके वाटून व त्यांना योजनेत सामिल होण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
३ जुलै रोजी सासवड येथे श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन झाले. सालाबादाप्रमाणे महावितरण कर्मचाऱ्यांमार्फत सेवा म्हणून वारकऱ्यांना पाणी बॉटलचे वाटप केले जाते. यंदाही मुख्य अभियंता सुनिल पावडे व कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांच्या प्रमुख उपस्थित पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. तसेच या ठिकाणी ‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेची माहिती देणारे बोर्ड लावण्यात आले. तसेच सविस्तर माहिती असणारी पत्रकेही वारकऱ्यांना देण्यात आली.
सूर्यघर योजनेत सहभागी होणाऱ्या वीजग्राहकांना केंद्र सरकारमार्फत २ किलोवॅट सौर प्रकल्पासाठी प्रतिकिलोवॅटमागे ३० हजार प्रमाणे ६० हजाराचे अनुदान दिले जाते. तर ३ किलोवॅट व त्यापुढील क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी ७८ हजारांचे अनुदान मिळते. ज्यांचा वीजवापर १५० युनिटपर्यंत असतो त्यांना २ किलोवॅट क्षमतेची व ३०० युनिट वापराकरिता ३ किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प पुरेसा आहे. सौर प्रकल्प बसविल्यावर संबंधित कुटुंबाचे वीजबिल कमी किंवा शून्य होणे शक्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी महावितरण प्रयत्नशील असल्याचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पवार, उपकार्यकारी अभियंता गणेश चांदणे यांचेसह शाखा अभियंते व जनमित्र उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!