उपमुख्यमंत्री यांच्या खाजगी जागेत पारधी समाज पाल टाकणार…..आठ दिवसापासून सुरु असलेल्या उपोषणाची प्रशासनाने घेतली नाही दखल.
बारामती : आदिवासी पारधी समाजातील लोकांना शासकीय घरकुले व घरासाठी जमिन उपलब्ध करून देत नसल्या कारणाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील खाजगी शेतजमिनीमध्ये आदिवासी पारधी समाज पाल टाकून राहणार असलेबाबतचे निवेदन पारधी परिवर्तन परिषदेच्या वतीने आदिवासी विकास मंत्री महारष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे.
बारामती तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये आदिवासी पारधी समाज वासतव्यास आहे. पारधी समाजातील लोकांना आजपर्यंत शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ दिला जात नाही. बारामती तालुक्यातील असणा-या सर्व ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी पारधी समाजाला जाणीव पूर्वक शासकीय योजनंपासून वंचित ठेवले जात आहे, तसेच त्यांना ग्रामपंचायती कडून मागणी करून देखील शबरी आवास योजनेचा लाभ दिला जात नाही. आदिवासी विभाग दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये हजारो कोटीचा निधी उपलब्ध करीत असतो. मात्र प्रशासकीय अधिकारी यांच्या नकारार्थी मानसिकतेमुळे आदिवासी विभागातील निधीचा इतरत्र विभागात निधी वळविला जात आहे. त्यामुळे आदिवासी पारधी समाजातील लोकांना आजअखेर तोंडला पाने पुसली जातात आहेत असेही निवेदनात नमूद केले आहे.
तालुक्यातील मळद येथील आदिवासी समाजातील दहा कुटूब मागील सात दिवसांपासून बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर उपोषणास बसले आहेत.मात्र अद्याप त्याठिकाणी शासकीय अधिकारी भेट सुद्धा घेत नाहीत वा आंदोलनाची दखल देखील घेतली जात नाही. त्यामुळे आंदोलकांनी आक्रमक पावित्रा घेत येत्या 4 जुलै रोजी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील खाजगी जमिनीवर प्रशासकीय भवनापासून पायी दिंडीने चालत जाऊन पाल टाकण्याचा इशारा प्रशासन आणि आदिवासी मंत्रालयाला दिला आहे.
