October 24, 2025

मोदी जेथे प्रचारासाठी गेले तेथे पन्नास टक्के उमेदवार पडले… शरद पवार

Picsart_24-05-16_19-00-21-157

बारामती : यावेळची निवडणूक ही सामान्य लोकांनी, तरुण पिढ्यांनी, कष्टकऱ्यांनी हातात घेतली होती. मी स्वतः आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते आम्ही एकत्र माझ्या घरी बसलो आणि आम्ही ठरवलं की आपण तिघांनी मिळून निवडणूक लढायची. मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये १८ दौरे केले, १८ ठिकाणी सभा केल्या. मला सांगायला वाईट वाटतं की ज्या अठरा ठिकाणी ते गेले त्यातील दहा ठिकाणी त्यांचा उमेदवार पडला आणि म्हणून परवा मी सांगितलं दिल्लीला जाईन त्या वेळेला भेटून सांगेन मोदी साहेब तुम्ही जिथे जिथे गेलात त्याचे ५० टक्के लोक पराभूत होतात. उद्या आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. तुम्ही जास्त तिथे या म्हणजे काय होतं ते आम्हाला बघायला मिळेल अशा शब्दात जेष्ट नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोरगाव येथील शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना टर उडविली.

पुढे बोलताना पवार म्हणाले की,  लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत काही लोकांनी दमदाटी केली, नवीन पिढीतल्या लोकांना आवर घालण्याचे काम काही लोकांनी केले. निवडणुकीच्या प्रचाराला गावात गेल्यानंतर गावातले जे पुढारी होते त्यांचा काही पत्ता लागला नाही, कुठे गायब झाले माहित नाही. नव्या पिढीने ताबा घेतला. माळेगाव कारखाना असेल, सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक असतील, जिल्हा बँक असो, पंचायत समिती असो किंवा बारामतीचे दूध संघ असो या संस्थांमध्ये जे जे काम करतात त्यातील बहुसंख्य लोक या निवडणुकीत दिसतच नव्हते. काय भानगड होती मला माहित नाही. नंतर चौकशी केली की लोक कोण होते ? कोणी सांगितलं की कोणी कारखान्याचे डायरेक्टर. हळू चौकशी केली पोलिसांकडून आणि पोलिसांना विचारलं हे कोण होते. त्यांनी सांगितलं काय विचारू नका त्यांचा धंदा होता हॉटेलचा तिथे काहीतरी दुसरंच बघायला मिळालं. लॉजिंगचा धंदा होता तिथे भलतेच लोक राहायला येतात याची बातमी आली. मला आश्चर्य वाटलं मोरगावला महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक अष्टविनायकाचे दर्शन घ्यायला येतात त्याची सुरुवात मोरगाव पासून होते. अशा पवित्र ठिकाणी लॉज मध्ये दुसरा धंदा चालतो अशी चर्चा बाहेर होणे हे या पवित्र ठिकाणाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे ? असा सवाल उपस्थित करीत हीच मंडळी कालच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या कामात गुंतली होती.असा समाचार अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा बोलताना शरद पवारांनी घेतला 

निवडणुकीमध्ये दहशत कधी असता कामा नये कारण ही लोकशाहीची लढाई आहे. लोकशाहीमध्ये शेवटच्या माणसाच्या मतदानाचा अधिकार हा निर्णायक आहे. लोकशाहीमध्ये नेता कितीही मोठा असला तरी सर्वसामान्य मतदार हा त्यापेक्षा मोठा असतो. काहीही करून पाणी इथे येईल याची काळजी घ्यायची गरज आहे. मी मंजूर केलेली जनाई शिरसाई योजना ही मोरगाव पर्यंत आणण्यासाठी सरकारने काळजी घेतलेली नाही. त्यामुळे आज अडचणी आहेत. त्या सोडवण्याच्या दृष्टीने निकाल घ्यायचा असेल तर राज्याची सत्ता हातात असणे गरजेचे आहे.

पाण्याचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. मला एक कलमी कार्यक्रम हातात घ्यायचा आहे काही मला दुसऱ्या गोष्टी करायच्या नाहीत. एका बाजूने शेती अडचणीत आहे पण आमची पुढची पिढी शिकली पाहिजे, जगात कुठेही गेली पाहिजे आणि यशस्वी झाली पाहिजे. म्हणून पाणी, शिक्षण, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचं आहे. ते करायचं असेल तर राज्य सरकार आपल्या हातात पाहिजे. मी ठरवलंय तुमची मदत ही होणार याची मला खात्री आहे. मी इथे न येता तुम्ही लोकांनी कष्ट केले आणि सुप्रियाला मत दिली त्यांना निवडून दिलं. मी काही आलो नव्हतो सांगायला, तुम्ही सगळ्यांनी कष्ट केले. आता मी सांगायला आलोय. पाणी आणि तरुण मुलांच्या हाताला काम या दोन गोष्टींच्या साठी लक्ष केंद्रित करणे हे एक कलमी कार्यक्रम हा माझ्याकडून होईल आणि त्याला मोरगाव असो, आजूबाजूची गाव असो या सगळ्यांचे सहाय्य हवे आहे. तुम्ही मला कधी नकार दिला नाही याही वेळेला देणार नाही  याची मला खात्री आहे आणि तेच काम आपल्याला करायचे आहे. असेही पवारांनी व्यक्त केलं.

You may have missed

error: Content is protected !!