अकॅडमी म्हणजे परीक्षेचा नंगा नाच
बारामती : ग्रामीण, मागासवर्गीय आणि दक्षिणेकडील राज्यांतील विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधातील नीट परीक्षा रद्द व्हावी म्हणून अनेक ठिकाणी मागील काही वर्षे आवाज उठत आहेत, कारण या होत असलेल्या परीक्षेत स्पर्धात्मक संधीत समानता दिसतच नाही आणि काही ठराविक शहरातील, उच्चभ्रू वर्गातील आणि ज्यांना खाजगी कोचिंग क्लासच्या रूपाने पालकांच्या मानगुटीवर बसलेल्या अकॅडमीच्या क्लासला जाणे शक्य आहे अशाच मुलांना यात यश मिळते असा देखील आरोप होत आहेत. तसेच त्या परिक्षेबद्दल असलेले इतर काही आक्षेप देखील आहेत.
लाखो मुलं वैद्यकीय करियर करण्यासाठी आपलं भविष्य पणाला लावून, बारावी नंतर गॅप घेऊन या परीक्षेची तयारी करत असतात. मात्र परीक्षा लिक होणे किंवा या संधीची असमानता याबरोबर यावर्षी नीट परीक्षेत झालेला भ्रष्टाचार आणि गलथान कारभाराचे आरोप झाले.
या परीक्षेतील MCQ पद्धतीवर सुद्धा आता आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत. चांगला डॉक्टर घडण्याचे किंवा वैद्यकीय शिक्षण घेण्याची पात्रता केवळ बुद्धिमत्ता चाचणी आणि विषयाचे MCQ द्वारा तपासलेले ज्ञान कसे काय असू शकते यावर आता जनमानसात खल होत आहे.
मुळात आपल्या देशात मेडिकल कॉलेजची संख्या कमी आणि त्यामुळे MBBS, BDS, MS, MD यासाठी द्याव्या लागणाऱ्या लाख ते कोटींच्या देणग्या थांबणं शक्य नाही. काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने capitation fees वर बंदी घातली होती मात्र हात ओले करणारे अधिकारी आणि जिथं गरज आहे तिथं टेबल खालून पैशाला पाय फुटतच आहेत म्हणूनच आपली तरुणाई युक्रेन, रशिया आणि आणखी कुठं कुठं वैद्यकीय डिग्रीसाठी भटकत असतात. तसं होऊ नये यासाठी केंद्र सरकारने मागील काही वर्षांत मेडिकल कॉलेज बनवण्याच्या कामात वेग आणला नाही. कोव्हिड नंतर सुद्धा या कामात गती आली नाही. लोकसभा निवडणुकीत बऱ्याच विरोधी पक्षांनी याबद्दल केंद्र सरकारचे दावे खोडून काढले. मात्र त्यावर पुढे काहीच झाले नाही.
प्रत्यक्ष प्रामाणिकपणे महाविध्यालायाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि त्यांना स्वहिमतीवर कष्ट करून मिळालेले मार्क त्याउलट या अकॅडमीमध्ये जाणारे विध्यार्थी यामध्ये मार्कांची स्पर्धा होऊ लागली आहे मात्र अकॅडमी मध्ये शिकणाऱ्याचे मुळी महाविध्यालायाचे प्रवेशच बोगस आहेत मग विद्याच बोगसरीत्या मिळविणारे नीटची परीक्षा नीट कशी देणार हा देखील प्रश्नच आहे.
ज्या अकॅडमी रूपाने शिक्षणाचा धंदा सुरु आहे त्याला वेळीच प्रस्थापितांनी थांबविले पाहिजे नाहीतर या गोरख धंद्यामुळे शिक्षणातील पाळेमुळे इतकी खोलवर जातील की याला थांबविणे कठीण होईल मग जेव्हा नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य ठीक नसताना वैद्यकीय शिक्षण नीट नसावे ही नक्कीच धोक्याची घंटा आहे.
