कर्जाच्या पैशांसाठी शरीरसुखाची मागणी

बारामती : आई वडिलांनी घेतलेले कर्ज आणि त्या कर्जाच्या पैशांवरील व्याज माफ करण्यासाठी एका १९ वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र तरुणीने याला विरोध केल्याने आरोपीने तिच्यावर चाकू हल्ला करीत तिला जखमी केल्याची घटना गुरुवारी, १६ तारखेला सकाळी घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय कुंभार (रा. भैय्यावस्ती मळद, ता. बारामती) याने तरुणीच्या आई वडिलांना कर्ज व उचल स्वरुपात पैसे दिले होते. मात्र, आरोपीने हे पैसे माफ करतो असे म्हणत फिर्यादी तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. फिर्यादी तरुणीने आरोपीला नकार दिल्याने. आरोपीने तरुणीचे तोंड दाबुन त्याच्याजवळ असलेल्या चाकूने तरुणीच्या मानेवर वार केला. तसेच तरुणीच्या पोटामध्ये चाकु खुपसण्याचा देखील प्रयत्न करुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. आरोपी दत्तात्रय कुंभार याच्यावर पोस्कोसह बाल लैंगिक अत्याचार तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड करीत आहेत.