राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र संपन्न

बारामती : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत, शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने, पुणे जिल्हा ग्रामीण महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या प्राध्यापकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर, वाणिज्य अधिष्ठाता डॉ. यशोधन मिठारे व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेंद्र शिंगणापूरकर यांनी मार्गदर्शन केले. तर उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. महामुनी यांनी केले. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ राजेंद्र शिंगणापूरकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आतापर्यंतचा प्रवास, त्याची सातत्याने होणारी वाटचाल त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातून येणाऱ्या सूचनांच्या आधारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केले गेलेले बदल व त्यानुसार आखलेला आराखडा याविषयी सांगितले. त्यानंतर डॉ. पराग काळकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणण्याच्या मागची भूमिका सविस्तर सांगितली. आजचे शिक्षण, अभ्यासक्रम व बदलती सामाजिक संरचना पाहिली तर शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल करणे ही काळाची गरज आहे असे स्पष्ट केले. वेगाने वाढत जाणाऱ्या व बदलत्या तंत्रज्ञानात वाढणारी ही पिढी आहे आणि यानुसार आपणही बदललं पाहिजे, काळाच्या बरोबरीने वाटचाल केली पाहिजे यासाठी या बदलाला आपण सकारात्मकदृष्ट्या सामोरे जाऊ. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सर्व शाखांचा समावेशक विचार कसा होईल याचा बारकाईने विचार केलेला आहे. असे आपल्या उद्घाटनपर भाषणात विचार व्यक्त केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभासाठी महाविद्यालयाचे उपप्रचार्य. डॉ. मोहन निंबाळकर, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. परिमिता जाधव व संस्थेच्या मानव संसाधन व्यवस्थापक गार्गी दत्ता उपस्थित होते.
प्रथम सत्राची सुरवात वाणिज्य अधिष्ठाता डॉ. यशोधन मिठारे यांनी केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वाणिज्य शाखेत विषयांची विभागणी कशी असेल, त्याचबरोबर कुठल्या विषयांचं एकत्रिकरण झालेलं आहे, त्यातील आपण विषय कसे निवडायचे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कोणताही विषय न गाळता सर्व विषयांची सांगड घालून आपला कार्यभार कसा टिकून राहील, हे सर्वांना समजावून सांगितले.
यानंतरचे सत्रामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बँकिंग अँड फायनान्स डॉ. किशोर निकम, यांनी क्रेडिटस या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर अकाउंटन्सी बोर्डाचे चेअरमन, डॉ. मनोहर सानप, यांनी मार्गदर्शन केले. युनिव्हर्सिटी ग्रँडस कमिशन व कोठारी आयोग यांच्या स्थापनेपासून ते आज तयार झालेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आराखडा याविषयी बदलत गेलेला प्रवास या विषयी सांगितले. यानंतर शेवटच्या सत्रामध्ये बिझनेस लॉ बोर्डाचे सदस्य डॉ. अशोक मोजाड यांनी घेतले. आपला सादरीकरणात त्यांनी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांवर आणि समाजावर कसा सकारात्मक परिणाम होणार आहे हे सांगितले. सध्या आपला विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून जातोय परंतु तो नोकरी व्यवसायापासून वंचित आहे, या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे हे चित्र बदलेल असे त्यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले. चर्चासत्राच्या समारोप सत्रात प्रा.डॉ. रूपाली सेठ, हुजूरपागा श्रीमती. दुर्गाबाई मुकुंददास लोहिया, डॉ. नागेश लामतुरे व प्रा. डॉ. भीमराव मोरे,, यांनी चर्चासत्र विषयी आपले मत मांडले. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व्यवस्थितपणे समजून घेऊन त्याची सकारात्मकरित्या अंमलबजावणी करू याविषयी विश्वास दर्शवला.
हे चर्चा सत्र 102 प्राध्यापकांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाले. सदर चर्चासत्राचे समन्वयन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. आश्लेषा मुंगी यांनी केले. यशस्वीतेसाठी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त, सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले.