बारामतीत दबक्या आवाजात एकच चर्चा… घड्याळ की तुतारी
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे, बारामतीच्या चौका – चौकात आणि कट्या काट्यावर दबक्या आवाजात सध्या एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे घड्याळ की तुतारी…
मेळावे, सभा, कोपरा बैठका, पदयात्रा, घरगुती गाठीभेटी, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार, फोन कॉल, बाईक रॅली या एक ना अनेक माध्यमातून होत असलेल्या नाट्यमय प्रचारात बारामतीचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र चौका चौकात प्रत्यक नागरिकांच्या उत्सुकतेचा एकच विषय आहे तो म्हणजे घड्याळ की तुतारी या चर्चांना नागरिकांमध्ये ऊत आला आहे.
रविवारी ( दि. 5 मे ) रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही उमेदवारांच्या सांगता सभा वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत, महाविकास आघाडीची सभा जुना मोरगाव रस्त्यावरील लेंडी पट्टी येथील मैदानावर दुपारी एक वाजता ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, तर महायुतीची सभा मिशन ग्राउंडवर दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पवार यांची परंपरेने नेहमी लोकसभेची सांगता सभा ही मिशन ग्राउंड मैदानात होत असते, मात्र पवार कुटुंबातच दोन गट पडल्याने आणि पवार विरोधी पवार असा लोकसभेचा सामना रंगल्याने यावेळी ते मैदान अजित पवार गटाने आरक्षित केल्याने यावेळी अजित पवार गटाची सांगता सभा त्या मैदानावर होणार आहे, त्यामुळे शरद पवार गटाने जागा बदलत नव्या जागी सांगता सभा ठेवली केली आहे.
मात्र बारामती हा पवारांचा अभेद्य गड कोणता पवार गट भेदणार आणि मतदार कोणत्या पवारांच्या गटाला संधी देणार या अंतिम टप्प्यात चर्चेला उधाण आले आहे.
पूर्ण कुटुंबाचे मतदारांना फोन…
नमस्कार मी टिंब..टिंब बोलतोय तुमचे मत टिंब..टिंब यांना द्या या आशयाचे फोन रेकॉर्डिंग कॉल मतदारांना दिवसातून दहा दहा वेळा येऊ लागल्याने यावेळी मतदार मात्र पुरा फोनला वैतागून गेला आहे. घरात प्रचार, घराच्या बाहेर प्रचार, गावात प्रचार, मोबाईलमध्ये देखील प्राचार अशी अवस्था वारामातीची आणि बारामतीकरांची झाली आहे.
बारामतीच्या काही भागात रात्रीच खेळ सुरु..
बारामतीच्या शहरी आणि ग्रामीण भागात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक घरातील व्यक्तीच्या एकूण सदस्यांच्या याद्या तयार केल्या आहेत, त्या का केल्या आणि कोणाच्या सांगण्यावरून केल्या आहेत, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे, तर दोन दिवस रात्रीची बारामतीत लाईट जात आहे त्यावरून नागरिकामध्ये उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.
