वाढत्या तापमानाने नागरिक हैराण.

बारामती : यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला आहे, उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांनी आरोगुआची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
यंदा सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असून या वर्षी कमाल आणि किमान तापमानात विक्रमी वाढ झाली आहे. शहरासह तालुक्यात तापमानात वाढीमुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. सकाळी ११ नंतर शहरासह ग्रामीण भागातील मुख्य रस्ते ओस पडत आहेत. रात्री उशिरापर्यंत नागरिकांना उष्णतेच्या झळा बसत असून उन्हाचा चटका वाढला आहे. याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. उन्हात फिरणे, जास्त प्रमाणात शारीरिक श्रम करणे, तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ आहारात घेणे किंवा अतिव्यायाम यातून उन्हाळ्यात त्रास होण्याचा धोका असतो. त्यासाठी या काळात योग्य आहार घेतला पाहिजे. त्यातून उन्हाळ्याचा त्रास कमी होईल. उन्हाळ्यात जेवण फारसे जात नाही. त्यामुळे पोळी, भाकरी अशा प्रकारच्या आहाराऐवजी सरबत, ताक, शहाळे, सूप असा द्रव आहार घ्यावा असे जाणकार वैद्यकीय तज्ञ यांनी सांगितले.
शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. त्याबरोबरच पाणी असलेली फळे खावीत. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पाणी भरपूर प्यावे, ओआरएस किंवा ग्लुकोज पावडर पाण्यासोबत प्यावे. घराबाहेर पडताना सुती, सैल, हालक्या रंगाची कपडे घालावीत, भरपूर ताजे अन्न खाऊनच घरातून बाहेर पडावे अशी काळजी घ्यावी.