शरद पवारांवर निशाना साधत अजित पवारांनी शेलक्या शब्दात रोहित पवारांना फटकारले

बारामती : एमआयडीसी आम्ही आणली. शिक्षण संस्था आम्ही काढल्या अशी भाषणे करीत आहेत, ते वालचंदनगरला शिकायला होते, याचा अर्थ बारामतीत त्यावेळी चांगल्या शिक्षण संस्था नव्हत्या ,आम्ही राजकारणात आल्या नंतर आम्ही चांगल्या शिक्षण संस्था आणल्या, आता बारामतीत वालचंदनगरची आणि आसपासच्या तालुक्याचे विध्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत, अश्या शेलक्या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खा. शरद पवार यांच्यावर निशाणा साधत आ. रोहित पवारांना फटकारले.
बारामतीत लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ येथील नटराज नाट्यकला मंडळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खा. शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांचा समाचार घेतला.
पुढे पवार म्हानले की, बारामतीतील डायनामिक्स कंपनी ही माझ्या उपस्थितीत झाली. औद्यगिक वसाहत आणणे सोपे आहे मात्र त्यांच्या गरजा आणि प्रश्न सोडविणे गरजेचे असते त्यामुळे अनेक कंपन्यांचे प्रश्न मी सोडवले आहेत. तसेच, बारामतीच्या औद्योगिक वसाहतीत अनेकांच्या बदल्या केल्या जात आहेत, तसेच त्यांना काढून टाकले जात आहे, मात्र सात मे पर्यंत थांबा त्यांचे सगळे खपवून घ्या, कुणाच्या भावनिक आवाहनाल आणि दबावाला बळी पडू नका त्यानंतर फक्त मी आणि तुम्हीच आहोत, बाकी कोणीही आपल्या मदतीला येणार नाही. शिवाय, जो कोणी त्रास देत असेल त्याला मी सोडणार नाही, असा सज्जड इशारा बारामतीच्या कारखानदारांना अजित पवारांनी बोलताना दिला.
नंदेला साडी चोळी देऊन पाठवून द्या
माहेरवाशीण घरी आली तर ननंदेने भावजयीशी चांगलं राहावे, माहेरवाशीणीचे चार दिवस चांगले आनंदात घालवावे, ननंद – भावजय दोघींमध्ये प्रेम असेल तर, नंदेची साडी चोळीने ओटी भरून आणि जावयाला फुल पोशाख करून ननंदेची तिची सासरी पाठवणी केली पाहिजे, तशीच तिची पाठवणी करा, अर्थात बटन दाबायचा प्रयत्न करू नका, असा टोला अजित पवारांनी खा. सुप्रिया सुळे यांना नाव न घेता लगावला.
40 वर्षे झाली तरी बाहेरची – बाहेरची
उपस्थित महिलांना उद्देशून तुम्ही सून म्हणून आला तर सून घरची असते, ती बाहेरची होत नाही, मात्र आमच्या इथे 40 – 40 वर्षे झाली तरी बाहेरची,….. बाहेरची,.. याचा तुम्हांला राग आला पाहिजे, ती सुन अनेक वर्षांपासून ज्या घरासाठी झटते आहे, त्याच सुनेला बाहेरची म्हणणे हा कुठला न्याय ? असा सवाल उपस्थित करीत, महिलांना मान – सन्मान द्यायला शिका तुम्ही महिलांचा अपमान करताय असा इशारा शरद पवार यांचे नाव न घेता दिला.
दादांनी मुजोर खाराखांदारांचा त्यांच्याच भाषेत घेतला समाचार
अनेक नोकरदारांच्या बदल्या केल्या जात आहेत, कामावरून काढले जात आहे, तुमची बदली केली जात असेल, तुम्हांला दमदाटी केली जात असेल तर घाबरू नका, जरा कळ काढा निवडणुकी नंतर तुमच्या जागेवर पुन्हा तुम्हांला आणतो, मात्र कायदा हातात घेऊ नका असा कामगारांना सबुरीचा सल्ला देत, कुठला कारखानदार किती उड्या मारतोय हे पाहतो, त्याच नाक कुठ कसं दाबायचे हे सगळं सगळ्यांना माहित आहे असे बारामतीत कामगारांवर होत असलेल्या अन्यायाला खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच वाचा फोडली.
कुंकू लावायचं असेल तर एकाचंच लावा.
दरम्यान बारामती तालुक्यातील मौजे शिर्सुफळ येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी ‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली तर पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही. काहीजण माझी सभा झाली की समोरच्या पार्टीकडे जातात. मी बिनविरोध पदे दिली याचा तुम्हांला विसर पडला आहे. कुंकू लावायचं असेल तर एकाचंच लावा. माझं तरी लावा नाहीतर त्यांचं तरी लावा. हा काय चाटाळपणा लावलाय. हे झाकून राहत नाही. नंतर मला कळते मी मागचे जुणंपुराणं उकरुन काढायचं नाही असं ठरवल आहे. मात्र आता कुठेही इकडचे तिकडचे करू नका. जर माझ्या बाबतीत काही चूक झाली तर त्यांनी पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही, अश्या शब्दात अजित पवार यांनी दोन डगरावर हात ठेवणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना दिला.