रशियाचा पुतिन आणि तुमच्यामध्ये फरक काय ?….शरद पवार

बारामती : सत्ता तुमच्या हाती आहे, तुमच्याविरोधी जो बोलतो त्याला तुरुंगात टाकण्यासाठी सत्ता घेता. मग रशियाचा पुतिन आणि तुमच्यामध्ये फरक काय ? असा सवाल उपस्थित करीत रशियात असलेली हुकुमशाही भारतात आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे, अशी शंका लोकांना आली तर त्याबद्दल लोकांना दोष देऊन चालणार नाही.अशा शब्दात जेष्ट नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली
महाविकास आघाडीचे माढा आणि सोलापूर या दोन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील व प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे जेष्ट नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पवार बोलत होते.
पुढे पवार म्हणाले की आपण जागरुक राहिलो नाही, परिवर्तन केलं नाही, हुकूमशाहीच्या पद्धतीने देशाचा कारभार करणाऱ्या ज्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती देशातील मूलभूत लोकशाहीचा अधिकार उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरु आणि इतर नेत्यांनी जो मूलभूत अधिकार आपल्याला दिला त्या अधिकारावर आज संकटाचे ढग दिसत आहे. देशाची सत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती आहे. लोकशाहीत सत्ता कोणालाही मिळते. ती लोकांसाठी चालवण्याचा अधिकार असतो. मात्र मिळालेली सत्ता जमीनीवर पाय ठेवून लोकांसाठी चालवायची भूमिका प्रत्येकाने घेतली पाहीजे. पंतप्रधान मोदींच्या हाती सत्ता असताना ते महाराष्ट्रात आणि देशात हिंसक भाषण देतात. जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, राहूल गांधी यांच्यावर टिका करतात. तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात. प्रधानमंत्री हा एका पक्षाची नाही तर संपूर्ण देशाचा असतो. पंतप्रधानांना प्रत्येक नागरिक हा आपला आहे, त्याचे आपण घटक आहोत, ही दृष्टी कायम ठेवली पाहिजे. मात्र जवाहरलाल नेहरूंवर टिका करण्यासाठी मोदी हे आपला वेळ वाया घालवतात. ज्या जवाहरलाल नेहरुंनी स्वातंत्र्याआधी आयुष्याची अनेक वर्षे तुरुंगात घालवली आणि गांधींच्या विचाराने देशाला स्वतंत्र करून दाखवले. देशाच्या स्वातंत्र्य लढाईनंतर संसदीय लोकशाही पद्धतीने आणि आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन हा देश पुढे नेण्याचा आणि देशाचा नावलौकीक जगात करण्याचे ऐतिहासिक काम नेहरूंनी केले. त्यांच्यावर टिका करण्याचे काम तुम्ही करता. तुम्ही प्रधानमंत्री म्हणून सर्वांना घेऊन चालले पाहिजे, दुर्दैवाने ती भूमिका पंतप्रधान यांची नाही, अशी खंत व्यक्त केली.