महिला वीज कर्मचाऱ्याचा घात ; वीज कर्मचारी संघटनांचा एल्गार
बारामती : किरकोळ वीजबिलाच्या कारणावरुन एका महिला वीज कर्मचाऱ्याचा खात्मा करणाऱ्या आरोपीचा बंदोबस्त करावा, तसेच भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. सर्व वीज उपकेंद्रांना व शाखा कार्यालयांना सुरक्षा रक्षक नेमावेत व दिवंगत रिंकू बनसोडे यांचा खटना जलदगती न्यायालयात चालवावा आदी मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, संघटना संयुक्त कृती समिती’ने प्रशासनाला निवेदन दिले आहे. प्रशासनाने उपाययोजना करण्यास चालढकल केल्यास नाईलाजास्तव रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागेल असा इशाराही कृती समितीने दिला आहे.
मोरगाव (ता. बारामती) येथे बुधवारी (दि. २४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास अभिजीत पोटे नावाच्या नराधमाने वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असलेल्या रिंकू गोविंदराव बनसोडे-थिटे यांची किरकोळ वीजबिलाच्या कारणावरुन कोयत्याने वार करत अत्यंत क्रूर व निर्दयीपणे हत्या केली. पोलीसांनी आरोपीला तातडीने अटक केली असली तरी त्याला लवकरात लवकर व कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविणे गरजेचे आहे. तसेच या घटनेमुळे महाराष्ट्रातील सबंध वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महावितरणच्या कामाचे स्वरुप पाहता वीज कर्मचाऱ्यांवर सातत्याने हल्ले होतात. मात्र रिंकू बनसोडे यांच्या हल्ल्याने या घटनेची तीव्रता लक्षात येते. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने खालील उपाययोजना कराव्यात अशी संघटनेच्या संयुक्त कृती समितीची आग्रही मागणी आहे.
१. रिंकू बनसोडे यांचा खटला जलदगतीने न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शासन करावे. त्यासाठी प्रथितयश व खातन्याम वकिलांची नेमणूक करावी.
२. अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष आराखडा त्वरित तयार करावा.
३. कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करावेत.
४. सर्व वीज उपकेंद्रे व शाखा कार्यालयांमध्ये २४X७ सुरक्षारक्षक नेमावेत.
५. रिंकू बनसोडे यांच्या वारसांना मदत व देयके तातडीने अदा करावीत.
६. सर्व वीज कर्मचाऱ्यांना लोक सेवकाचा दर्जा मिळवून द्यावा.
७. वीजबिल वसुली व वीजचोरी रोखताना अनेकदा ग्राहकांच्या रोषाला बळी पडावे लागते त्याकरिता बंद केलेली स्वतंत्र पोलीस ठाणे पुन्हा सुरु करावीत.
संयुक्त कृती समितीने वरील मागण्यांचे निवेदन महावितरणचे मुख्य अभिंयता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर यांना देण्यात आली आहेत.
