अजित पवारांना दिलासा, निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रचार सभेत विकास निधीवरून केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना क्लीन चिट दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग झाला नसल्याचे निदर्शनास येत आहे. असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी बोलताना सांगितले. तर आपण हा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. ते जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत आणि त्याची प्रत राज्य निवडणूक आयोगाला देखील पाठवली आहे, असे रिटर्निंग ऑफिसर कविता द्विवेदी यांनी सांगितले.
काय म्हणाले होते अजित पवार ?
इंदापूर येथील सभेत विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजेल तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा. म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आणि निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार करण्यात आली होती.
