सुप्रिया ताईंकडे, सुनेत्रा वहिनींचे कर्ज
बारामती : सध्या पूर्ण देशाचे ज्या लढतीकडे लक्ष लागले आहे, ती लढत म्हणजे बारामती लोकसभा मतदार संघाची, या मतदार संघात, खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार असा नणंद – भावजयचा सामना असणार आहे. जरी या कुटुंबात सध्या दुही निर्माण झाली असली तरी नात्यातून झालेली देणी घेणी मात्र दाखवावीच लागत आहेत, त्याचा प्रत्यय निवडणुकीसाठी दिलेल्या शपथ पत्रातून समोर आला आहे.
खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाजयीकडून, म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रुपयांचे तर सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ अजित पवार यांच्याकडून 20 लाख रुपये असे एकूण 55 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. तर सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे या दाम्पत्यांकडे साधारण 152 कोटींची देशात आणि विदेशात संपत्ती असल्याचे शपथपत्रात नमुद केले आहे.
दादांपेक्षा वहिनी श्रीमंत
तर दुसरीकडे मालमत्तेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी सुनेत्रावहिनी पवार या श्रीमंत आहेत, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे साधारण 37 कोटी 15 लाख 70 हजारांची मालमत्ता आहे तर सुनेत्रा पवार यांच्याकडे 58 कोटी 39 लाख 40 हजारांची मालमत्ता आहे. त्यामुळे दादांपेक्षा वहिनी श्रीमंत आहेत.
