रोहित पवारांचे अजित पवारांना आव्हान… धाडस असेलतर नाव सांगा.
बारामती : अजित दादा त्यांच्याच भावांची बदनामी का करत आहेत ? तुमच्यात धाडस असेल तर त्या भावांचे नाव घ्या, काय प्रकरण आहे ते सर्वांच्या समोर येऊ द्या, एकदाचे दुधका… दुध, पाणी का… पाणी होऊ द्या, उगाच मोघम का बोलताय ? आणि भावंडांची बदनामी का करताय असा सवाल आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना उपस्थित केला.
आमदार रोहित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत, त्या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पुढे आ. रोहित पवार म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित दादा मित्र मंडळाचा जो पक्ष आहे तो पक्ष त्यांचे लाभार्थी तसेच त्या लाभार्थीयांना साथ देणारे भाजपाची काही लोकं असे दोघे मिळून इथल्या स्वाभिमानी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना धमकावत आहेत.
बारामतीतील या लाभार्थ्यांना इथली लोकं मलिदा गँग असे म्हणतात, त्या मलिदा गँगचे बहुतांश लोकं ही ठेकेदार आहेत, त्यांचे ठेके चालावीत यासाठी तसेच सुनेत्रा वहिनींना कमी मते पडू नयेत यासाठी ही मलिदा गँग प्रयत्न करीत आहे. ते धमकावत आहेत तर शहरात गुंडांचा देखील वापर केला जात आहे. ही गोष्ट चुकीची आहे अशी प्रथा बारामती लोकसभा मतदार संघात यापूर्वी कधीच नव्हती तर लोकांचापाठींबा कोणाला आहे हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल असेही रोहित पवार यांनी व्यक्त केले.
