तुम्ही कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही…शरद पवार
बारामती : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोन करून दमदाटी काही लोकं करीत असल्याचे मला समजले आहे मात्र तुम्ही कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद आहे असे म्हणत पुन्हा हा महाराष्ट्र ऐक्याने चालवू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
बारामतीत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला त्यावेळी खा. शरद पवार बोलत होते. यावेळी मेळाव्यास शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर, खासदार सुप्रिया सुळे, यांच्यासह शिवसेनेचे इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी व खडकवासला या तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ठिकाणी भाषण केले की, मी दोन पक्ष फोडून सत्तेवर आलो असे ते म्हणाले. आता यांचं काय कर्तृत्व ? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी काय काम केलं ? पक्ष फोडण्याचं काम केलं ! कुणाचं घर फोडण्याचे काम केलं ! खऱ्या अर्थाने महाराष्ट्र फोडण्याचे काम त्यांनी केले असल्याचे व्यक्त केले.
फडणवीस यांना हे माहित नाही, त्यांनी पक्ष फोडला असेल, काही लोक गेली असतील, मात्र त्यांना हे माहीत नाही की, काही लोक गेले असतील, फोडले असतील, मात्र हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक आहेत, ते मात्र जागेवरच आहेत. ते त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा ऐक्याने महाराष्ट्र चालवू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी हीच संधी आहे असेही व्यक्त केले.
देशात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या प्रमुखांनी राज्यात दहशत निर्माण केली असल्याचा आरोप राज्यसरकार वर करीत. निवडणुका महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत, मात्र आता कोणी फोन करतो. कोणी धमक्या देतो असले प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत, पण त्यांना हे माहीत नाही, तुम्ही कितीही दम दिला व धमक्या दिल्या, तरीही त्याला भीक न घालणारी ही अवलाद आहे. ती अवलाद कुणाही समोर झुकणार नाही असेही व्यक्त केले.
