अॅड. विजय गव्हाळे बारामती लोकसभा निवडणूक अपक्ष लढविणार

बारामती : सध्याची परिस्थितीत ही विस्थापित आणि प्रस्थापित यांच्या लढाईची आहे. मी विस्थापितांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा आवाज उठविण्यासाठीच बारामती लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करीत असल्याचे अॅड. विजय गव्हाळे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.
गव्हाळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते पुढे गव्हाळे म्हणाले की, बारामती लोकसभा निवडणुकीत पवार विरोधी पवार अशी लढत आहे तर एक पवार पडला तर दुसरा पवारच निवडून येणार आहे. म्हणजेच आचा पडला तर मचा येणार आणि मचा पडला तर आचा निवडून येणार… सरते शेवटी पवारच असणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघात पवार घराण्याच्या साठमारीला वैतागलेली अनेक लोकं आहेत त्या लोकांना तिसरा पर्याय म्हणून मी उमेदवारी दाखल करीत आहे.
पवारांनी नेहमी जनतेला वेठीस धरले आहे निवडणुकीला त्यांच्याच घरातला एक व्यक्ती जनतेच्या छाताडावर नेता म्हणून बसविला जात आहे. अनेक वर्षांपासून पवार कुटुंबाने फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतले आहे मात्र विशिष्ट समाजापुर्तेच त्यांनी सत्ता आणि राजकारण केले आहे. वापरा आणि फेका हीच पवार कुटुंबाची नीती राहिली आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता याच उद्देशातून पवार कुटुंबाने नेहमी काम केले आहे. या सत्तेच्या स्वार्थांमधुन अनेक मातब्बार संपविले आहेत.
बारामतीचा विकास हा बेगडी विकास आहे तर विकासाच्या नावावर नेहमी जनतेला फसविण्याचे काम पवारांनी केले आहे. त्या विकासालाच माणसे वैतागली आहेत, केवळ रस्ते आणि इमारती बांधून विकास होत नाही तर बारामतीत आजही सरकारी शाळा आणि सरकारी आरोग्य यंत्रणा मोडकळीस आली आहे. या ठिकाणाचा सुशिक्षित आजही मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. बारामतीत अनेक वर्षांपासून पवार यांना बारामतीकरांनी भरभरून मतदान करून देखील आजही शहरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे, त्याचा जाणीव पुर्वक वर्षानु वर्षे विकास केला नाही, त्यांचा दलित विकास निधी दलितांच्या विकासासाठी न वापरता इतरत्र वापरला जात आहे. दलितांना त्यांच्या मुलभूत गरजांपासून वंचित ठेवले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेच्या धुंदीतून खाली उतरायला तयार नाहीत सत्ता आणि पैशाच्या जोरावर धमकीचे राजकारण त्यांनी केले आहे. तर पवारांना असे वाटू लागले आहे की त्यांच्या मुळेच जनता आहे. त्या मस्तीला टाळ्यावर आणण्यासाठी मी उमेदवारी दाखल करणार आहे असे गव्हाळे यांनी सांगितले.