बारामतीच्या उपकारागृहातून पळून जाणारा आरोपी जखमी

बारामती : बारामतीच्या उपकारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपी भिंतीवरून पडला आणि जखमी झाल्याची घटना घडली आहे. भैरू भानुदास शिंदे ( वय 40 रा. खातगाव ता. करमाळा ) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.
आज सोमवार ( दि. २६ मार्च ) रोजी सकाळी ही घटना घडली आहे. एका खुनाच्या गुन्ह्यात भैरू शिंदे हा आरोपी बारामतीच्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे, सध्या बारामतीचे उपकारागृह हे हलविले जात असून तेथील कैदी पुण्याच्या येरावडा कारागृहात हलविले जात आहेत, आपल्याला देखील येरावड्याला नेले जाणार अशी भीती आरोपीला आल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
बारामतीचे उपकारागृह हे बारामतीच्या श्रीमंत बाबूजी नाईक वाड्यात आहे त्या वाड्याचे शुशोभीकरणाचे काम सध्या सुरु आहे, तसेच येथील पोलिस ठाणे यापूर्वीच हालविण्यात आले आहे तर कारागृह अद्याप हालविले नाही ते देखील जुने झाले असून तेथील कैदी येरावडा कारागृहात हालविले जात आहेत त्या भीतीने आरोपी तयारी करून पलायनाच्या तयारीने बाहेर पडला मात्र वाड्याच्या उंच भिंतीवर चढल्यावर उडी मारताना घाबराला अखेर मनाची तयारी करून त्याने भिंतीवरून उडी मारली खरी मात्र तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.