अवैध गॅस रिफील सेंटरवर पोलिसांचा छापा, आठ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त

बारामती : घरगुती वापराचा गॅस बेकायदेशीर व्यावसायिक गॅस टाकीत तसेच इतर लहान मोठ्या गॅस टाकीत रिफील करून विक्री करीत असणारांवर वडगावनिंबाळकर पोलिसांनी छापा टाकत आठ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वडगावनिंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे मुर्टी ता बारामती येथे बंद पोल्ट्रीमध्ये अवैध गॅस रिफील होत असल्याची खबर पोलिसांना लागली मौजे मुर्टी येथे संकेत जगदाळे याच्या बंद पोल्ट्रीमध्ये लोणंद येथील मल्हारी गॅस एजन्सी कडून घरगुती गॅसच्या टाक्या अनुन त्या घरगुती वापराचा गॅस बेकायदेशीर व्यावसायिक गॅस टाकीत तसेच इतर लहान मोठ्या गॅस टाकीत रिफील करून चढ्या भावाने विक्री करीत असलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये पोलिसांनी संकेत जगदाळे, मयूर जगदाळे ( दोघे रा. मुर्टी, ता. बारामती ), यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर ठिकाणी तीन अशोक लेलंड टेम्पो, भारत कंपनीच्या 27 गॅस टाक्या, एच.पी.कंपनीच्या 123 गॅस टाक्या, पोलिसाच्या हाती लागल्या आहेत तसेच गॅस ट्रान्सफर करणाऱ्या मोटरी व मशीन या सह एकूण आठ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त पोलिसांना मिळून आला आहे. याप्रकारे धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग केला तर परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो म्हणून संबंधितांवर पोलिसांनी कारवाई केली तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्या प्रमाणे सुद्धा पोलिसांनी कारवाई केली आहे
सदरची कारवाई पुरवठा विभागाच्या मदतीने उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमारे, पोलिस हवालदार वैभव साळवे, यांच्यासह वडगावनिंबाळकर पोलिस ठाण्याचे इतर पोलिस कर्मचारी यांनी केली असून या प्रकरणी पुरवठा निरीक्षक रविंद्र पारधी यांनी फिर्याद दिली आहे.