बारामतीत दोन्ही पवार गटाकडून सोशल मिडीया संघर्ष

बारामती : बारामतीत लोकसभा निवडणुकीच्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांचे सख्खेभाऊ श्रीनिवास पवार यांनी तोंड सुख घेतल्यानंतर आता अजित पवार गटाने आक्रमक होत एका निनावी पत्राद्वारे श्रीनिवास पवार यांच्या टीकेला चोख उत्तर देत सुज्ञ बारामतीकर या नावाने पत्र समाज माध्यमात फिरत आहे.
बारामती लोकसभा निवडणूक खा सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होणार हे निश्चित झाले असले तरी बारामतीची जागा अजित पवार गट लढणार हे अद्याप महायुतीकडून जाहीर करण्यात आले नाही मात्र राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदार संघाचा प्रचार दोन्ही गटाने चांगलाच मनावर घेतला आहे. सध्या बारामतीत दोन्ही गटाकडून सोशल मिडीया संघर्ष सुरु असून दोन्ही गट सोशल मिडीयावर एकमेकांचा समाचार घेण्यात कुठेही मागे नाही असेच चित्र झाले आहे.
नुकतेच श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर तोंड सुख घेतले मात्र त्यानंतर त्याचे पडसाद बारामतीत वेगवेगळ्या माध्यमातून पडताना दिसत आहेत, सुज्ञ बारामतीकर या नावाने समाज माध्यमात एक पत्र सध्या फिरत असून त्यामध्ये श्रीनिवास पवार यांचे बोलणे म्हणजे खोटा सहानुभूतीदार असल्याचे म्हटले आहे. तर अजित पवार यांनी राजकारणात स्व कर्तृत्वाच्या जोरावर नाव कमावले असून अजित पवारांच्या कामाची पावती खुद्द शरद पवार यांनी अनेकदा जाहीररीत्या दिली आहे. फक्त काका असून चालत नाही तर त्या कसोटीला देखील उतरण्याचे नेतृत्व आणि कर्तृत्व आसवे लागते असा श्रीनिवास पवार यांना टोला लगावत, नालायक हा शब्द वापरताना आपण बारामतीकरांसाठी काय केले ? असा देखील सवाल पत्राच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. तर बारामतीकर घोंगडी भिजवत ठेवणाऱ्या खोट्या सहानुभूतीदाराच्या नव्हे तर विकास पुरुषाच्या मागे उभा राहतील असा विश्वास या पत्रात व्यक्त केला आहे.
तर शरद पवार गटाने त्या पत्राला उत्तर देत अजित पवार गटाने सोशल मिडीयावर सोडलेले पत्र म्हणजे लाभार्थ्यांनी फिरविले असून हे मत लाभार्थ्यांचे आहे. सर्वसामान्य सुज्ञ बारामतीकरांचे नाही, लाभार्थी म्हणजे लोकसंखेच्या एक टक्काही नसल्याचा टोला लगावला आहे. तर या पत्राशी स्वाभिमानी बारामतीकर सहमत नाहीत असे प्रतिउत्तर शरद पवार गटाने दिले आहे.