जातीयवादी शक्तींना त्यांची जागा दाखवा
बारामती : देशात जातीयवादी शक्ती डोक वर काढू पाहत आहे, त्याला आवर घातला पाहिजे, ते करायचे असेल तर आगामी निवडणूकीत त्या जातीयवादी शक्तींना त्यांची जागा दाखवा असे आवाहन ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी केले.
बारामतीत खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत होलार समाजाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पवार बोलत होते. पुढे पवार म्हणाले की, अनेक देशात लोकशाही असूनही संविधान मजबूत नसल्याने सरकार नीट चालत नाही. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशी घटना लिहीली आहे की, ज्यामुळे देश एकसंघ राहू शकला आहे. आज देश एकसंघ आहे याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना द्यावे लागेल. मात्र ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांच्याकडून वेगळ्या दिशेने देशाचा गाडा चालविला जात आहे, देशाच्या घटनेत बदल करण्याचे स्वप्न भाजपचे नेतृत्व पाहत आहे आणि त्यासाठीच भाजपा मत मागत आहे. घटना बदलली तर सामान्य माणसाचा अधिकार हिरावून घेतले जातील. मराठवाडा विध्यापिठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय आम्ही घेतला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात जाळ-पोळ झाला, मात्र जर का ज्या महान व्यक्तीने संपूर्ण देशाला घटना दिले त्यांचे नाव देणे हा जर का आम्ही गुन्हा केला असे म्हणत असाल तर तो गुन्हा आम्ही केला त्याची आम्हांला फिकीर नाही नाव दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि आज विध्यापिठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे.
बारामतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे, सगळ्यांना माहिती आहे की इथला मतदार विचारी आहे, येथील गावगाडा योग्य आणण्यासंबंधीची कुवत ज्या व्यक्तीमध्ये आहे, अशा सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवून महाराष्ट्राचा नावलौकीक वाढविण्याचे आवाहन पवार यांनी करीत लोकसभेतील खासदारांपैकी आवल खासदारांमध्ये बारामतीच्या खासदाराचे नाव पहिल्या दोघात येते. तुमचे प्रश्न लोकसभेत मांडणारा आणि तुमच्या सुख दुःखाशी समरस होणारा उमेदवार आम्ही दिलेला असून सुप्रिया सुळे यांना विजयी करण्याचे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.
