वकील संरक्षण कायद्यासाठी आग्रही असेन,… वकीलांच्या स्नेह मेळाव्यात सुनेत्रा पवार यांची ग्वाही

बारामती : संपूर्ण जगाच्या इतिहासात वकीलांचे स्थान मोलाचे राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्यासह भारताच्या उभारणीत वकील असणार्या नेत्यांचे मोठे योगदान आहे. समाजात बुद्धीजीवी आणि भाषाप्रभू अशी वकीलांची ओळख आहे. अशा मान्यवर वकीलांना मार्गदर्शन करण्याऐवजी त्यांचेच मार्गदर्शन मला मोलाचे ठरणार असून वकील संरक्षण कायद्यासह वकीलांच्या विविध प्रश्नांसाठी मी आग्रही असेन, अशी ग्वाही एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे दिली.
बारामती, इंदापूर आणि दौंड बार असोसिएशनच्या वकीलांच्या प्रचंड संख्येने पार पडलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्यासाठी तीनही तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या वकीलांची प्रचंड गर्दी पाहून एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार भारावून गेल्या होत्या. खचाखच गर्दीने सभागृह ओसंडून वाहिल्याने या अलोट प्रतिसादाची दखल घेत त्या म्हणाल्या, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयाच्या इमारती उभ्या राहिल्या. तालुक्याच्या ठिकाणीच सर्वसामान्य जनतेला जलद गतीने न्याय मिळावा यासाठी अजित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. न्यायालयाच्या आवारात आवश्यक असणार्या सोयी सुविधांबाबत वकील बंधू, भगिणींनी व्यक्त केलेल्या अपेक्षांना तडा जावू देणार नाही. पुणे जिल्ह्याला वकीली क्षेत्राची असणारी उज्वल परंपरा उंचावणार्या वकीलांचे प्रश्न सोडवणुकीसाठी मी कटीबद्ध राहिन, असाही विश्वास त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बारामती वकील संघटनेच्या वतीने अध्यक्ष अॅड. उमेश काळे, अॅड.रमेश कोकरे, अॅड. हरिष तावरे, अॅड.नितीन भामे, अॅड.प्रभाकर बर्डे, अॅड.सुप्रिया बर्गे, अॅड.स्नेहा भापकर, अॅड.प्रिया गुजर, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव अॅड. निलिमा गुजर तसेच दौंड वकील संघटनेच्या वतीने अॅड. अझरुद्दीन मुलाणी, अॅड. संदीप शेलार तर इंदापूर वकील संघटनेच्या वतीने अॅड.किरण धापटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्नेह मेळाव्यास माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. केशव जगताप, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. जी. बी. गावडे, अॅड. जी. के. देशपांडे, अॅड. आर. डी. प्रभुणे, अॅड. व्ही. बी. गावडे, व्ही. एस. बर्गे, अॅड. अविनाश गायकवाड, अॅड. विनोद जावळे, अॅड. शामराव कोकरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बारामती, इंदापूर, दौंड बार असोसिएशनच्या वतीने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
स्वागत व सूत्रसंचालन अॅड.अमर महाडीक यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. शलाका जगताप यांनी केले तर अॅड. शुभम निंबाळकर यांनी यांनी आभार मानले.
तुम्ही त्यांना साथ दिलीत, आम्ही तुम्हाला साथ देऊ
वकीलांच्या समस्यांबाबत यापूर्वी ज्यावेळी अजितदादांकडे गेलो त्यावेळी त्यांनी अपेक्षापेक्षा काकणभर अधिकच दिले आहे. सुनेत्रा पवार या स्वत:ही गेली 25 वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. नटराज नाट्य मंडळ असो, की क्रीडा चळवळ असो. शैक्षणिक क्षेत्रात झालेले नाव असो, की महिला सबलीकरणासाठी कृतशील प्रयत्न असोत. अशा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, महिला सबलीकरण, ग्रामस्चच्छता अशा विविध पातळीवर त्यांनी योगदान दिले आहे. वकीलांसोबत सर्वच घटकांसाठी अजितदादांनी दाखवलेली तडफ आज सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. अजितदादांच्या या तडफेला भक्कमपणे साथ देण्याचे काम सुनेत्रा पवार यांनी केले असून आता त्यांना भरभक्कमपणे साथ देण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये आम्ही अग्रेसर राहू, अशी ग्वाही यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या मनोगतात दिली.