बारामतीत बिबट्याचा वावर…. नागरिकांना सतर्क राहण्याचे वनविभागाचे आवाहन
बिबट्याचे संग्रहित छायाचित्र
बारामती : शहरातील मेडद परिसरातील गटकळ वस्तीवर बिबटयाचा वावर असल्याने या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील तीन दिवसांपूर्वी बिबट्याने एका कुत्र्याची शिकार केली होती. सलग तीन दिवस शिकार करण्यासाठी बिबटया गटकळवस्ती परिसरात येत असल्याची प्राथमिक माहिती नागरिकांकडून दिली जात आहे.
दरम्यान वनविभागाने या परिसरात बिबटयाची शोध मोहीम हाती घेतली असून. मागील चार दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील मौजे खांडज परिसरात देखील बिबट्याचा वावर असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी दिली.
नागरिकांनी घाबरू नये तसेच सावध राहण्यावे एकट्याने रात्री अपरात्री शेतात जाऊ नये, हातात काठी, तसेच टाॅर्च घेऊन जावे, तसेच सकाळी देखील फिरायला जाताना काळजी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने केले आहे. बिबटयाची शोध मोहिम सुरु असून वनविभागाचे कर्मचारी याच कामावर असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी सांगितले.
