देशात लोकशाही राहिलेली नाही… गुंडाराज सुरु आहे….खा सुळे.
खा. सुप्रिया सुळे यांचे संग्रहित छायाचित्र.
बारामती : देशात सध्या लोकशाही राहिलेली नाही, ही सरकारची दडपशाहीच सुरु आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र राहिलेला नाही, सध्या गुंडाराज सुरु झाला आहे. या गुंडगिरीच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढणार आहोत असे मत खा. सुप्रिया सुळे यांनी बोलताना व्यक्त केले. खा सुळे या बारामती दौऱ्यावर असताना बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले.
पुढे खा सुळे म्हणाल्या की, पाण्याच्या टंचाई बाबत तसेच बेरोजगारी बाबत देखील सरकारला अनेकदा सांगून देखील फायदा होत नाही. मी स्वतः टॅँकरची मागणी करत आहे मात्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्याला हमीभावही मिळत नाही त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो आहे. शेतक-यांच्या विरोधातील हे केंद्र सरकार असून, शेतक-यांनी जर पिकविण्याचे बंद केले तर या देशाचे काय होईल, असा सवाल उपस्थित करीत सरकारने वेळीच या विषयी विचार केला पाहिजे असेही व्यक्त केले.
तर आंध्रप्रदेश, ओरिसा, जम्मू काश्मीर येथील आरक्षणाचे प्रश्न सरकारने लोकसभेत मांडले, मग राज्यातील मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचा मुद्दा का आणला नाही, महाराष्ट्र सरकारने राज्यातील आरक्षणाचे प्रश्न केंद्र सरकारकडे पाठवलेलेच नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे, इतर राज्य पाठवतात मग महाराष्ट्र सरकार का प्रश्न पाठवत नाहीत, असा सवाल खा सुळे यांनी माध्यमांच्या माध्यमातून राज्य सरकारला विचारला आहे. तर मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा आंदोलन करीत आहेत तर त्यांची ही सरकारने केलेली फसवणूक नाही तर काय आहे ? असाही सवाल खा सुळे उपस्थित केला.
