बारामती येथे हर्शोल्हासात पार पडला एक दिवसीय निरंकारी संत समागम
मनुष्याने मानवी गुणांनी युक्त होऊन जीवन जगावे…! निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज
बारामती : “मनुष्य जीवन अनमोल आहे. त्याचा मुख्य उद्देश लक्षात घेऊन ब्रह्मज्ञानाद्वारे ईश्वराची ओळख करून भक्ती करावी आणि मानवीय गुणांनी युक्त होऊन सुंदर जीवन जगावे. असे उदगार सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी काढले. सदरचा निरंकारी संत समागम बारामती येथील टी सी कॉलेजच्या भव्य मैदानावर मंगळवारी (ता. 6) आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्यांनी वरील उदगार काढले.
या समागमास बारामती परिसरासह, पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर नाशिक, संभाजीनगर, उस्मानाबाद आदी भागातून पन्नास हजाराहून अधिक श्रद्धाळू भाविक सज्जनांनी सद्गुरू माताजींच्या दिव्य दर्शनाचा आणि प्रवचनाचा लाभ घेऊन सत्संगचा मनमुराद आनंद लुटला. भक्तीचे सार समजवताना सद्गुरु माताजी पुढे म्हणाल्या की, आपण सर्वांनी प्रेम आणि भक्तीपूर्ण जीवन जगले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या या मनुष्य जीवनाचे सदैव सुंदर कर्माने जगून सर्वांप्रती आपलेपणाचा भाव मनामध्ये ठेवला पाहिजे. कोणाविषयी ही वैर, ईर्षा, नफरतेची भावना मनामध्ये न ठेवता, प्रत्येकामध्ये या ईश्वराचेच रूप पाहून सर्वांवर प्रेम केले पाहिजे. प्रत्येक कार्यामध्ये ईश्वराला प्रथम प्रदान्य देऊन भक्तिमार्गावर पुढे चालत राहून जीवन सार्थक करावे.
सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले की, ब्रह्मज्ञानाद्वारे ईश्वराला जाणून त्याच्याशी एकरूप होऊनच अंतर्मनात शांती येईल. ही मिळणारी अंतर्मनातील शांती चिरकाल टिकेल, कारण परमात्मा सदैव आमच्या अंग-संग आहे आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रत्येक क्षणी त्याची जाणीव मनामध्ये ठेवल्यामुळे आम्ही कधीच विचलित होणार नाही. सदैव एक पूर्ण माणूस म्हणून संत प्रवृत्तीने जीवन जगून भक्तीच्या मार्गावर अग्रेसर व्हावे.
शेवटी सद्गुरु माताजींनी सांगितले की, मनुष्य जीवनाचे अंतिम ध्येय आत्म्याचे परमात्म्याशी मिलन करून मोक्षप्राप्तीचा मार्ग सोपा करावा. यासाठीच सदैव परमेश्वराचा आधार घेऊन भक्तीपूर्ण जीवन जगून आपल्या सुंदर कर्माने जीवनबाग सजवून इतरांना देखील भक्तिमार्गात जोडण्यासाठी प्रेरणा मिळावी.
समागमाच्या समारोपप्रसंगी स्थानिक झोनल प्रभारी श्री. नंदकुमार झांबरे यांनी सर्व उपस्थित भाविक सज्जन शहरवासी यांच्या वतीने दिव्य जोडीचे मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आणि स्थानिक प्रशासन व शासकीय विभागाकडून लाभलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
