शारदानगर महिला महाविद्यालयात राज्यस्तरीय स्वयंसिद्धा युवती संमेलनाचे आयोजन
बारामती: अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित शारदाबाई पवार महिला महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ, समता सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत शारदानगर येथे अकरावे स्वयंसिद्धा युवती संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
यंदाचे संमेलनाचे ११ वे वर्षं असून संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य निलेश नलावडे, संस्था समन्वयक प्रशांत तनपुरे, संस्थेच्या एचआर हेड गार्गी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होत आहे.
या संमेलनामध्ये राज्यातील अनेक विद्यार्थिनी सहभागी होतात. विद्यार्थिनीच्या आयुष्याला वेगळे वळण देणारे संमेलन म्हणून या संमेलनाकडे पाहिले जाते. सहभागी युवतींना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांची ओळख व्हावी, त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल व्हावा, पुढील आयुष्यात त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान द्यावे, त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावेत हा या संमेलनाचा मुख्य हेतू असतो. प्रत्येक सहभागी विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देण्यात येते. या युवती संमेलनामध्ये ‛माझे महाविद्यालय- आमच्या महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट उपक्रम’ व ‛मी युथ आयकॉन – माझी उत्कृष्ट कामगिरी’ या दोन स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत सहभागी महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट उपक्रमाचे सादरीकरण करावयाचे आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरी व सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थिनीस ‛युथ आयकॉन’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. चार दिवसांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, विचारवंत, खेळाडू, अभ्यासक, राजकीय नेतृत्व सहभागी युवतींना मार्गदर्शन करणार आहेत, त्यामध्ये पूरोगामी स्त्रीवादी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ता डॉ. सुषमा अंधारे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, टेड स्टॉक स्पीकर अभिषेक ढवाण, प्रेरणादायी वक्ते इंद्रजीत देशमुख, पुणे येथील प्रेरणादायी वक्ते वसंत हंकारे, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या छाया कोरेगावकर, अभिनेत्री व महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कल्याणी सोनोने, बेसबॉल खेळाची भारताची कर्णधार खेळाडू व महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी रेश्मा पुणेकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश सावजी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण निकम, वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान मांडवगण फराटा संस्थेच्या सचिव मृणाल फराटे पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख स्वामीराज भिसे, मानसशास्त्र अभ्यासिका पद्मांजली पाटील, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र पवार, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेच्या सचिव सुनंदा पवार, सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा इत्यादी मान्यवर आहेत.
ज्या युवतींना या संमेलनामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी महाविद्यालयास फोन किंवा इमेल करून नाव नोंदवावे. राहण्याची व जेवणाची व्यवस्था महाविद्यालयाचे वतीने करण्यात येणार आहे. या संमेलनासाठी प्रवेश शुल्क ४०० रुपये असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. संपर्कासाठी महाविद्यालयाचे पुढील फोन नंबर आहेत. स्वयंसिद्धा युवती संमेलनाचे समन्वयक प्रा. रा. बा. देशमुख : ९९६०२५९०६७, उपप्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर : ९७६६४४४४६९ , विज्ञान शाखा प्रमुख डॉ.परिमीता जाधव: ९०९६१९११०४ , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.रोहिदास लोहकरे : ९८२२७३०५६४ इत्यादींशी संपर्क साधवा.
