October 24, 2025

शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात ‛स्टुडन्ट ऑफ द इयर २०२४’  कार्यक्रम उत्साहात संपन्न.

IMG-20240130-WA0086
बारामती : शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात ‛स्टुडन्ट ऑफ द इयर २०२४’ ची पदवी विभागातून प्रणाली विजय भोसले व पदव्युत्तर विभागातून कु. प्रणाली नंदकुमार रणदिवे यांची ‛स्टुडन्ट ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली.
शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयामध्ये प्रत्येक वर्षी ‛स्टुडन्ट ऑफ द इयर’ हा उपक्रम आयोजित केला जातो. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनमधून एका विद्यार्थीनीची ‛स्टुडन्ट ऑफ द इयर’ म्हणून निवड केली जाते. त्या विद्यार्थिनींचा सत्कार केला जातो. या सत्कार समारंभात विद्यार्थिनींचे आई-वडिल, नातेवाईक इत्यादीना सहभागी करून घेतले जाते. विद्यार्थिनींना काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळावी त्यातून तिचे अस्तित्व निर्माण व्हावे आणि पालकांनाही मुलांप्रमाणे मुलीही आयुष्यात काहीतरी करून दाखवितात याची जाणीव व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
‛स्टुडन्ट ऑफ द इयर’ विद्यार्थिनीची निवड करण्यासाठी सर्व प्राध्यापकांकडून विद्यार्थीनीची नावे घेतली जातात, त्यामध्ये विद्यार्थिनींची उपस्थिती, महाविद्यालयीन कार्यक्रमांमधील सहभाग, राष्ट्रीय सेवा योजना सहभाग, राष्ट्रीय छात्र सेना सहभाग, खेळातील सहभाग, राष्ट्रीय परिषदांमधील सहभाग, संशोधन पेपर सादरीकरण इत्यादी उपक्रमातील सहभाग कसा आहे हे सादरीकरण व मुलाखतीच्या माध्यमातून त्या विद्यार्थिनींची निवड केली जाते.
  हा कार्यक्रम अप्पासाहेब पवार सभागृहात आयोजन केले होते. प्रथम ढोल-ताशाच्या गजरात मानांकन मिळालेल्या विद्यार्थिनींची महाविद्यालयातून मिरवणूक काढली गेली. ५७ विद्यार्थिनींची निवड झाली होती ४० विद्यार्थिनींना नामांकन मिळाले होते व शेवटी दहा विद्यार्थिनींचे मानांकन झाले होते. संपूर्ण सभागृह गर्दीने तुडुंब भरले होते. आपल्याच वर्गातील, आपल्या शाखेतील विद्यार्थिनी हा पुरस्कार जिंकणार आहे याची उत्सुकता, तणाव व उत्साह यामुळे वातावरणात अगदी फुलून गेले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे उच्च विभागाचे शिक्षण सहसंचालक केशव तुपे उपस्थित होते.
  पदवी विभागातून कु. पायल जाधव,  भाग्यश्री विजय भोसले,  प्रणाली विजय भोसले,  सुप्रिया शेलार, विशाखा संजय निकाळजे,  गायत्री गहुले तर पदव्युत्तर विभागातून कु. दामिनी विलास बनकर, प्रणाली रणदिवे, अंजली हनुमंत पवार,  ऐश्वर्या धावणे इत्यादी विद्यार्थिनींचे मानांकन झाले होते. त्यातून पदवी विभागातून प्रणाली विजय भोसले व पदव्युत्तर विभागातून कु. प्रणाली नंदकुमार रणदिवे यांची ‛स्टुडन्ट ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केशव तुपे आपल्या मार्गदर्शन व्याख्यानात म्हणाले की, “हा उपक्रम अतिशय चांगला आहे. प्रत्येक महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविला गेला पाहिजे. हा उपक्रम एवढा भव्य-दिव्य आयोजित केला जात असेल असे मला वाटले नाही . या कार्यक्रमातील फील मला इतर कोणत्याच कार्यक्रमात अनुभवायला मिळाले नाही. अनेक कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारचा फील येत नाही, या कार्यक्रमात जिद्द होती, चिकाटी होती, भावनिक संघर्ष होता. या सर्व विद्यार्थिनी आजूबाजूच्या परिस्थितीशी संघर्ष करताना दिसतात, झगडताना दिसत आहेत. शारदाबाई पवार महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींची ध्येय वेगळे आहेत,  हे महाविद्यालय विद्यार्थिनींसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे, असे मला वाटते. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ‛स्टुडन्ट ऑफ द इयर’ निवड झालेली कु. प्रणाली विजय भोसले  मनोगतात म्हणाली, “मी या महाविद्यालयात प्रवेश घेतला कारण या महाविद्यालयात खूप उपक्रम आयोजित केले जातात, सर्वांना संधी दिली जाते, मलाही  खूप संधी मिळाल्या, त्यामुळे माझी आज  हा ‛स्टुडन्ट ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली. कु. प्रणाली नंदकुमार रणदिवे हिने आपला खेळातील प्रवास सांगितला, कडू-गोड अनुभव सांगितले आणि जिद्द, चिकाटी, मेहनत याची सांगड घातली तर यश मिळतेच असे ती म्हणाली.
  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. डॉ. मोहन निंबाळकर यांनी केले सूत्रसंचालन प्रा. डॉ. आश्लेषा मुंगी व आभार प्रा. रोहिदास लोहकरे यांनी केले. या कार्यक्रमास विज्ञान शाखाप्रमुख डॉ. परिमिता जाधव, ‛स्टुडन्ट ऑफ द इयर’ समितीचे समन्वयक डॉ. मोहन निंबाळकर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. दिनेश मोरे, विद्यार्थी मंडळाचे प्रमुख डॉ. राजकुमार सुरवसे,  विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी प्रा.रोहिदास लोहकरे, सर्व विभागप्रमुख,  कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

You may have missed

error: Content is protected !!