December 6, 2025

शारदानगरमध्ये औषधी वनस्पती व जीव विज्ञानातील संशोधनावर” राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Screenshot_2024_0129_134303
बारामती : दिनांक 2 व 3 फेब्रुवारी रोजी शारदानगर येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने औषधी वनस्पती व जीव विज्ञानातील संशोधनावर आधारित दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्र, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय भारत सरकार, वनस्पतीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे.
संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सचिव सुनंदा पवार, कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे, मानवी संसाधन प्रमुख गार्गी दत्ता व प्रोफेसर दिगंबर मोकाट यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेच्या आयोजनाची तयारी सुरू आहे.
या परिषदेसाठी महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड, गोवा इत्यादी राज्यांमधील 150 हून अधिक शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी होत आहेत, असे परिषदेचे निमंत्रक व प्राचार्य एस. व्ही. महामुनी यांनी सांगितले प्रो. सत्यांशू कुमार, ( आनंद),  प्रो. अरुण चंदन (धर्मशाळा),  प्रो. एस. के दास (भुवनेश्वर),  डॉ. दत्तात्रय नाईक (पुणे), प्रो. के. एस. लड्डा (मुंबई),  प्रो. अरविंद धाबे (छत्रपती संभाजीनगर), डॉ. प्रकाश ईटणकर (नागपूर), डॉ. बिना लॉरेन्स (कन्याकुमारी), डॉ. अजय नामदेव (पुणे), डॉ. संगोराम अपूर्वा (पुणे), प्रो. दिगंबर मोकाट (पुणे),  आदी संशोधक शास्त्रज्ञ या परिषदेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेमध्ये सुगंधी वनस्पती व त्यांचे नॅनो सायन्स व जैवतंत्रज्ञान, व त्यांचे उपयोग, जैव विविधता व ॲग्रोटेक्नॉलॉजी, औषधी व सुगंधी वनस्पती मार्केटिंग व मूल्य संवर्धन इत्यादी विषयांवर संशोधकांमध्ये चर्चा, विचार विनिमय व मार्गदर्शन होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. होत असून एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे माजी कुलगुरू,  डॉ. एस. एस. मगर, आयुर्वेदिक ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, मुंबईचे संचालक, मूलराज वडोर, हे उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी खास शेतकऱ्यांसाठी विशेषत: औषधी वनस्पतींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास अश्वगंधा व इतर प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या वनस्पतींच्या शेती संदर्भात कार्यशाळेचे आयोजन केले असून यामध्ये पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राचे विभागीय संचालक प्रो. दिगंबर मोकाट मार्गदर्शन करणार असल्याचे या परिषदेच्या संयोजन सचिव प्रो. बी. एम. सकदेव यांनी सांगितले. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन समन्वयक प्राध्यापक आर. बी. देशमुख यांनी केले आहे. सहभागासाठी इच्छुक सन्माननीय शेतकऱ्यांनी  98228916690, 9960259067  या क्रमांकावर संपर्क करावा.
परिषदेच्या समारोप प्रसंगी परिषदेत सादर झालेल्या उत्कृष्ट संशोधन पत्रिकेच्या संशोधकास पारितोषिक देवून गौरविण्यात येईल. परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या औषधी वनस्पतीसंबंधीत पेंटिंग, ड्रॉइंग, वक्तृत्व, निबंध आदी स्पर्धेच्या विजेत्यांचाही उचित गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. वनस्पती संवर्धन व पुनरुत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती यांचा सन्मानही यावेळी करण्यात येणार आहे.
error: Content is protected !!