बारामतीत पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल
बारामती : या पूर्वी बारामती शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या व सध्या पुणे मुख्यालय येथे कार्यरत पोलिस कर्मचारी याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
सध्या पुण्यात असलेल्या व या पूर्वी बारामतीत वास्तव्यास असलेल्या एका युवतीने फिर्याद दिली आहे. बारामतीत वास्तव्यास असलेल्या या तरुणीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, पोलिस कर्मचारी यांनी तिला पूर्वी मदत केली होती, त्या बदल्यात त्यांनी तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादीला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देखील दिली.
या त्रासाला कंटाळून बारामतीतून त्या युवतीने पुण्यात स्थलांतर केले. मात्र आरोपी पोलिस कर्मचारी यांनी तिच्या बहिणीला फोन व मेसेज करून आत्महत्येची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घोडके हे करीत आहेत अशी माहिती पोलिस निरिक्षक दिनेश तायडे यांनी दिली .
