October 24, 2025

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र पुरस्कृत राज्यस्तरीय करिअर संसदेचे शारदानगर येथे आयोजन

Picsart_24-01-02_17-50-34-440
बारामती : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे शारदाबाई पवार महिला  महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शारदानगर येथे दिनांक 11 व 12 जानेवारी 2024 रोजी विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय “करियर संसद” या अधिवेशनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयातून महाविद्यालयाच्या करिअर संसदेतील पदाधिकारी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित राहणार आहेत. विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 400 विद्यार्थ्यांनी याकरिता अगोदरच नोंदणी केली आहे, हे विशेष, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी यांनी याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र अर्थात एमआयटीएससी आणि महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महाविद्यालयामध्ये “करिअर कट्टा” नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आजच्या तरुणांना आकार देऊन उद्याचे एक चांगले भविष्य घडविणे, हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.  33 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर आत्तापर्यंत या केंद्राने शक्तिशाली प्रभाव निर्माण केला आहे. आयएएस आपल्या भेटीला, पर्यावरण शास्त्र अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा तयारी, उद्योजकता विकास केंद्र, 50 मोफत करियर उपयोगी कोर्सेस याकरता आम्ही व शासन मदत करतो असे सांगितले.
तर प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी म्हणाले की, अशा प्रकारचे राज्यस्तरीय अधिवेशन प्रथमच घेण्याचा बहुमान महाविद्यालयाला मिळाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिनिधिक स्वरूपात आलेल्या महाविद्यालयांच्या विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रतिनिधींना शारदानगर शैक्षणिक संकुल, एडीटी-अटल इंक्युबॅशन सेंटर, कृषी विज्ञान केंद्र, सेंटर ऑफ एक्सलन्स इन हॉर्टिकल्चर तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स इन डेअरी, सायन्स पार्क पाहण्याची संधी मिळणार आहे. या अधिवेशन काळामध्ये शारदानगरच्या एडिटि-अटल इंक्युबॅशन सेंटर बरोबर महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचे माध्यमातून महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयाबरोबर स्टार्ट अप तसेच उ‌द्योजकता मार्गदर्शन हेतू करार करण्यात येणार आहे. या अधिवेशनाकरिता महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार रोहित पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार  सत्यजीत तांबे,  अभिजीत वंजारी तसेच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, भारत सरकारच्या ऊर्जा व कौशल्य विभागाचे सचिव डॉ. प्रफुल्ल पाठक, समाज कल्याण पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त  विशाल लोंढे, भारत संचार निगम लिमिटेड पुणेचे जनरल मॅनेजर  विलास बुरडे, वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी महाव्यवस्थापक भूषण कोळेकर इत्यादी अधिकारी तसेच बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनाचा निश्चितच प्रभाव महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांच्या करिअर कट्टा उपक्रमावरती पडेल आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थी बारामतीतून चांगले उपक्रम व ज्ञान घेऊन आपापल्या स्थानी जातील आणि भविष्यात अनेक होतकरू तरुण निर्माण होऊन महाराष्ट्र घडवतील, असे या निमित्ताने अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी सांगितले. पुढे ते असे म्हणाले की, दुष्काळी परिस्थिती आणि बेकारीच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी नोकऱ्यांच्या पाठीमागे न लागता उद्योजक बनावे. अनेक क्षेत्रे आपल्याकडे उपलब्ध आहेत. तरुणांनी कष्ट करण्यास लाजू नये. चांगला माणूस बनणे, हे सुद्धा कौटुंबिक उद्धाराकरीता गरजेचे आहे. या करीता सदर उपक्रमाद्वारे निश्चितच मार्गदर्शन होईल. करिअर संसद या राज्यस्तरीय अधिवेशनाकरिता अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त व सेक्रेटरी सुनंदा पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे यांनी शुभेच्या दिल्या आहेत.

You may have missed

error: Content is protected !!