बारामतीत संविधान गौरव बाईक रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

बारामती : भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली संविधान गौरव बाईक रॅली उत्साहात संपन्न झाली. या बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याला उस्फुर्त प्रतिसाददेत शेकडो संविधानप्रेमी युवकांनी या बाईक रॅलीमध्ये उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी भारतीय संविधान आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने संपूर्ण शहर दणाणून गेले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या बाईक रॅलीचा प्रारंभ झाला. त्यांनंतर पुढे शहरातील मुख्य बाजारपेठेतून फिरून या बाईक रॅलीची सांगता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी झाली. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन देखील करण्यात आले. त्याचसोबत दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. या आनंदाच्या आणि ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने उपस्थितांना लाडू वाटत आनंदोत्सव देखील साजरा करण्यात आला.
संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो युवकांनी या संविधान गौरव रॅलीमध्ये सहभाग नोंदवत हि रॅली यशस्वीरित्या संपन्न केली.